Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखदूरदृष्टी लाभलेला सामाजिक कार्यकर्ता

दूरदृष्टी लाभलेला सामाजिक कार्यकर्ता

जनार्दन पाटील

बिंदेश्वर पाठक यांच्या निधनामुळे देश एका महान सामाजिक कार्यकर्त्याला मुकला आहे. प्रचलित काळात सामाजिक कार्यकर्ते नानाविध नागरी समस्यांना हात घालताना दिसतात. आधुनिक राहणीमानाशी संबंधित पाणी, रस्ता, आरोग्य आदी विषयांसाठी पाठपुरावा करतात. मात्र शौचालयांच्या समस्येचा साकल्याने विचार करणारे, त्यासाठी अवघी हयात पणाला लावणारे विरळच. त्या दृष्टीने विचार करता बिंदेश्वरजींचे कार्य अजोड ठरते. आजघडीला देशभर शहरांचे नेटके नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. शहरांचा विकास ही चांगली बाब आहे; पण खेड्यांकडे लक्ष देणेही तितकेच आवश्यक आहे आणि तीही स्वच्छ केली पाहिजेत. मात्र शौचालयांच्या कमतरतेच्या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. त्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच पाठक यांच्या निधनाने जणू आधुनिक काळात स्वच्छतेचे महत्त्व ओळखणारा धुरंदर सामाजिक कार्यकर्ता लयाला गेला आहे.

आज देशात वेगवेगळी स्वच्छता अभियाने सुरू असताना, भंगीमुक्तीची घोषणा केली जात असताना स्वच्छतागृहांच्या शोषखड्ड्यात पडून अनेकांचे बळी जात आहेत. अशा वेळी बिंदेश्वर पाठक यांच्या पाच दशकांपूर्वीच्या भंगीमुक्तीच्या अभियानाचे महत्त्व लक्षात येते. त्यांनी ‘सुलभ इंटरनॅशनल’ची स्थापना केली. १९७०च्या दशकात ‘सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसेस’चा पाया घातला. याद्वारे त्यांनी देशभरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक ठिकाणी शौचालये बांधली. सुलभ शौचालयाच्या नावाने आज या शौचालयांचे जाळे संपूर्ण देशात आहे. त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आणि उपेक्षित लोकांच्या सक्षमीकरणासाठी खूप काम केले. स्वच्छ भारत घडवणे हे त्यांचे ध्येय होते.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिंदेश्वर पाठक यांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर ते बिहार गांधी शताब्दी उत्सव समितीमध्ये कार्यकर्ता म्हणून सामील झाले. येथे त्यांनी ‘भंगीमुक्ती सेल’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथेच त्यांनी हाताने शौचालये साफ करणाऱ्या कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी १९७० मध्ये ‘सुलभ इंटरनॅशनल’ची स्थापना केली. या अंतर्गत कमी खर्चात सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा थांबवून अस्वच्छ सार्वजनिक शौचालयांच्या जागी स्वच्छ शौचालयांचे स्वप्न पाहिले आणि प्रत्यक्षातही आणले. देशभरातील सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालये बनवण्याचे श्रेय त्यांच्या संस्थेला जाते. ही कमी किमतीची स्वच्छतागृहे ‘इको-फ्रेंडली’ मानली जातात. ‘सुलभ’ मॉडेलवर बांधलेली शौचालये ही सार्वजनिक शौचालये बांधण्याच्या क्षेत्रात क्रांती मानली जाते. त्यांची संस्था मानवी हक्क, पर्यावरण, स्वच्छता, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास आणि व्यवस्थापन तसेच कचरा व्यवस्थापनासह सामाजिक सुधारणांना चालना देण्यासाठी कार्य करते. त्यांनी १९६८ मध्ये प्रथम ‘डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेट’चा शोध लावला.

घराच्या आजूबाजूला मिळणाऱ्या साहित्यापासून ते कमी खर्चात बनवता येते. हे जगातील सर्वोत्तम तंत्रांपैकी एक मानले गेले. पुढे ‘सुलभ इंटरनॅशनल’च्या मदतीने त्यांनी देशभर सुलभ टॉयलेटची साखळी उभी केली. अनेक दशकांपासून सार्वजनिक सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेने यापूर्वी काबूलमध्ये शौचालये उपलब्ध करून दिली होती. अमेरिकेच्या लष्कराने त्यांना त्यासाठी विनंती केली होती. अमेरिकन लष्कराने ‘बायो गॅस’च्या विशेष पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या टॉयलेटची मागणी केली होती. अशी प्रभावी आणि स्वस्त शौचालये काबूलमध्ये सर्वत्र बसवावीत, अशी लष्कराची इच्छा होती. ‘सुलभ इंटरनॅशनल’ने भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, चीन, भूतान, नेपाळ आणि इथिओपियासह इतर दहा देशांना शौचालयाशी संबंधित तंत्रज्ञान दिले होते.

डॉ. पाठक यांच्या घरात कधी शौचालय नव्हते. त्यांच्या घरातील स्त्री-पुरुषही शौचासाठी घराबाहेर शेतात जात असत. त्यामुळे त्यांच्या घरातील सदस्य वांरवार आजारी पडत असत. बालपणीच्या या घटनांचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. लहानपणी त्यांनी विचार केला होता की, मोठे झाल्यावर आपल्या घरातच नव्हे तर संपूर्ण देशात शौचालये बांधायची आहेत; जेणेकरून इतर घरातील लहान मुले, महिला आणि वृद्धांना शौचासाठी घराबाहेर पडावे लागणार नाही. बालपणी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या घरात नऊ खोल्या होत्या; पण एकही शौचालय नव्हते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी बनारसला गेले. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रात पदवी संपादन केली. पुढे त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएच.डी. पदवी पूर्ण केली. १९७० मध्ये त्यांनी ‘सुलभ इंटरनॅशनल’ सुरू केले.

१९६८-६९ मध्ये डॉ. पाठक यांनी बिहार गांधी जन्मशताब्दी उत्सव समितीसोबत सामाजिक कार्याला सुरुवात केली. येथेच त्यांना परवडणारे टॉयलेट तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सोपवण्यात आले. यादरम्यान त्यांनी देशभर फिरून हाताने सफाई आणि उघड्यावर शौचास जाण्याच्या समस्येवर काम केले. यादरम्यान त्यांना जवळच्या लोकांकडून टोमणेही ऐकावे लागले. कारण ते उच्चवर्णीय होते आणि शौचालयासाठी काम करत होते; मात्र पाठक यांनी पर्वा केली नाही. ‘सुलभ इंटरनॅशनल’ ही सामाजिक संस्था होती. या संस्थेमध्ये त्यांनी दोन स्वदेशी फ्लश टॉयलेट विकसित केले. विशेष म्हणजे त्यांनी ते ‘डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेट’ म्हणून विकसित केले. त्यांनी देशभरात सुलभ शौचालये बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही काळातच त्यांनी देशभरात सुलभ शौचालयांची साखळी उभी केली. त्यांनी आपल्या आयुष्यात १.३ दशलक्ष घरगुती शौचालये आणि ५४ दशलक्ष सरकारी शौचालये बांधली. डॉ. पाठक यांनी ‘सुलभ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’च्या माध्यमातून २७५ कोटींहून अधिक रुपयांचे साम्राज्य उभे केले. त्यांच्या संस्थेत साठ हजार लोक काम करतात. देशातील सार्वजनिक शौचालयांचे जनक असलेल्या बिंदेश्वर पाठक यांना ‘टॉयलेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते.
डॉ. पाठक यांनी ‘पीएच.डी. थीसिस’चा एक भाग म्हणून देशभर प्रवास केला. सफाई कामगारांसोबत राहत असताना त्यांना एक नवी ओळख मिळाली. त्यांची संस्था मानवी हक्क, पर्यावरण स्वच्छता, ऊर्जेचे अपारंपरिक स्त्रोत, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाद्वारे सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. त्यांच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे गंधहीन बायोगॅसचे उत्पादन करण्याबरोबरच सेंद्रिय खताचे महत्त्वाचे घटक असलेले फॉस्फरस आणि इतर घटकांनी समृद्ध असलेले स्वच्छ पाणीदेखील बाहेर पडते. त्यांची स्वच्छता चळवळ हरितगृह वायू उत्सर्जन प्रतिबंधित करते.

डॉ. पाठक यांना त्यांच्या कामगिरीबद्दल ‘एनर्जी ग्लोब पुरस्कार’, दुबई आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ‘स्टॉकहोम वॉटर पुरस्कार’, फ्रान्सच्या सिनेटचा ‘लिजेंड ऑफ द प्लॅनेट पुरस्कार’ आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पोप जॉन पॉल दुसरे यांनी १९९२ मध्ये डॉ. पाठक यांना पर्यावरणासाठी आंतरराष्ट्रीय सेंट फ्रान्सिस पारितोषिक देऊन सन्मानित करत कौतुक केले होते. २०१४ मध्ये त्यांना सामाजिक विकासाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सरदार पटेल आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हाताने सफाई कामगारांच्या मुलांसाठी दिल्लीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यापासून वृंदावनमधील परित्यक्ता विधवांना आर्थिक मदत करण्यापर्यंत किंवा राष्ट्रीय राजधानीत शौचालयांचे संग्रहालय उभारण्यापर्यंत पाठक आणि त्यांच्या ‘सुलभ इंटरनॅशनल’ने नेहमीच उपेक्षितांसाठी काम केले. त्यांच्या निधनामुळे स्वच्छतेच्या क्षेत्रात अत्यंत रचनात्मक काम करणारा एक मोठा सामाजिक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -