फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे
विवाहबाह्य संबंध हा विषय असला की, सर्वसाधारणपणे पुरुषांनाच दोष दिला जातो. खरं तर टाळी एका हाताने वाजत नाही, हे कोणाला सांगायला नको. विवाहित पुरुष जरी महिलेकडून चुकीची मागणी करत असेल तरी महिलेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याशिवाय प्रकरण पुढे जात नसतं. महिला जेव्हा एखाद्या विवाहित, संसारी आणि मूलबाळ असलेल्या पुरुषाच्या आयुष्यात प्रेम, आकर्षण, ओढ, शारीरिक संबंध, भावनिक गुंतवणूक, मानसिक आधार, पती स्वर्गवासी झालेला असणे, फारकत झालेली असणे, अविवाहित असणे, आर्थिक गरज यातील कोणत्याही कारणास्तव प्रवेश करते, तेव्हा तिने त्याच्या आयुष्यात असलेलं दुय्यम तसेच तात्पुरतं स्थान, कधीही संपुष्टात येऊ शकणारं नातं आणि स्वतःच्या मर्यादा ओळखून राहणं खूप गरजेचं आहे. अवास्तव अपेक्षा करून उगाच एखाद्या पुरुषाचा संसार उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला अधिकार नाही, हे समजून उमजूनच असली प्रकरणे करा, अन्यथा त्या वाटेला जाऊच नका.
कोणताही पुरुष जेव्हा पत्नी असतानादेखील दुसऱ्या स्त्रीशी अनैतिक संबंध प्रस्थापित करतो, त्यावेळी त्यामागे अनेक हेतू असू शकतात. पत्नीपासून पूर्ण न होणाऱ्या शारीरिक, मानसिक गरजा, पत्नीशी होणारे वैचारिक मतभेद, कौटुंबिक वादांमुळे त्यांच्यात पडलेले अंतर, पत्नी-पतीला पुरेसा वेळ देण्यात कमी पडणे, पत्नीचं दुसऱ्या ठिकाणी प्रेम प्रकरण सुरू असणं, आर्थिक वाद, पत्नी अथवा पती कामानिमित्त बाहेरगावी असणे, माहेरी जावून राहणे, अनेक ठिकाणी निव्वळ मजा, चंगळ, थ्रील या करितादेखील पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवतात. काही वेळेस संबंधित मैत्रिणीकडून स्वार्थ साधणे, आर्थिक फायदा करून घेणे, हा देखील पुरुषाचा हेतू असू शकतो. अनेकदा असे संबंध तयार होणं हा निव्वळ योगायोग अथवा टाइमपासही असू शकतो. पुरुषाचा हेतू काहीही असो, महिलेला पण गरज असते. म्हणून अनैतिक संबंध पुढे जातात.
समुपदेशनसाठी जेव्हा विवाहबाह्य संबंधांमुळे वैतागलेले पुरुष येतात, तेव्हा लक्षात येते की, पुरुषांनासुद्धा अनेकदा अशा रिलेशनशिपमधून खूप मानसिक त्रास सहन करावा लागतोय. पुरुषांचे म्हणणे असते, आम्ही समोरील महिलेलाही पूर्व कल्पना दिलेली होती, की मी विवाहित आहे. माझ्यावर माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत. मी तुला माझ्या आयुष्यात कितपत किती वेळ आणि कसं स्थान देऊ शकतो, हे मी आधीच सांगितलं होतं. माझं कुटुंबं माझ्यासाठी प्राधान्य आहे, हेही मी स्पष्ट केलं होतं, असे सांगतात. तरीही आजमितीला जिच्याशी असे संबंध आहेत ती महिला पुरुषाला स्वतःमध्ये अधिक अधिक गुंतवण्यासाठी, त्याचा संसार डिस्टर्ब करण्यासाठी, त्याच्या घरच्यांना पुरेपूर मानसिक यातना देण्यासाठी, विवाहबाह्य संबंध त्याच्या घरी कळावेत, त्याचं आयुष्य सैरभैर व्हावं, यासाठी हटवादीपणा करते आहे. जेव्हा असे प्रकरण अंगाशी येते तेव्हा पुरुष प्रचंड तणावात येतात. त्यांना पच्छाताप करण्याशिवाय पर्याय राहत नाही.
अविनाश (काल्पनिक नाव) चार वर्षांपासून त्याचे सुमन (काल्पनिक नाव) सोबत रिलेशन होते. सुमनच्या पतीचे आजारपणामुळे तरुण वयात निधन झाले. सुमन तिच्या दोन लहान मुलांना घेऊन पतीच्या घरात राहत होती. अविनाश आणि सुमनची कामानिमित्त भेट झाली. भेटीचे रूपांतर प्रेमात आणि शारीरिक संबंधात होऊन दोघेही मागील चार वर्षं सुमनच्या घरी किंवा बाहेर भेटत होते. सुमनला विचारणारं कोणी नव्हतंच. मुलं पण लहान होती. त्यामुळे सुमन खूप पटापट अविनाशला स्वतःकडे वळवून घेत गेली. त्याच्या आवडी-निवडी जपणं, त्याला हवं नको ते पाहणं, त्याला जास्त वेळ देणं, तो तिच्या घरी आल्यावर पती-पत्नी सारखं राहणं, त्याच्या सर्वच गरजा भागवण्यात ती कुठे कमी पडू देत नव्हती. अविनाश पण अतिशय अॅक्टिव्ह, स्मार्ट, सगळ्या कामात हुशार, त्याला मनापासून प्रेम करणाऱ्या, त्याच्यासाठी धावपळ करणाऱ्या, त्याच्या पुढे पुढे करणाऱ्या सुमनवर खूप इंप्रेस झाला होता.
अविनाशच्या घरी हे प्रकरण थोडं फार माहिती झालं होतं. त्यावरून घरात थोड्याफार कुरबुरी होतच होत्या. अविनाश बायको-मुलांना, घरातल्यांना व्यवस्थित सांभाळतो, जीव लावतो, अशी प्रकरणं काही खूप दिवस टिकत नाहीत. त्यात काही तथ्य नाही, हे अविनाशची पत्नी जाणून होती. अविनाशच्या पत्नीला काहीही झालं तरी आपला संसार आणि नवरा प्रिय होता. त्यामुळे ती खंबीर होती. मागील एक-दीड वर्षांपासून सुमन अविनाशसाठी चांगलीच डोकेदुखी बनली होती. अविनाशचं म्हणणं होतं, सुमन त्याला खूप ताब्यात ठेवायला बघते. माझं माझ्या बायको-मुलांवर नितांत प्रेम आहे, हे मी सुमनला सांगितलं आहे, असेही अविनाश म्हणत होता.
मागील सहा महिन्यांत तर सुमन सात-आठ वेळा डायरेक्ट अविनाशच्या घरी जाऊन पोहोचली होती. त्याच्या घरात बिनधास्त हक्काने वावरणं, त्याच्या घरातील माणसांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं, त्याच्या नात्यातील व्यक्तींशी बोलायचा प्रयत्न करणं, सगळ्यांसमोर अविनाशशी बिनधास्त बोलणं, त्याच्याशी शारीरिक जवळीक करणं यामुळे अविनाशच्या घरातील वाद विकोपाला जात होते.
सुमनची अपेक्षा होती की, मी इतके वर्षे तुला माझ्या घरी येऊ दिलं. मनमोकळे राहिलो, भेटलो. तुला हवं ते सगळं मी पुरवलं. मग मला तुझ्या घरी येण्याचा हक्क नाही का? तू का घरच्यांना घाबरतोय? मला बायकोचा दर्जा हवा आहे, यासाठी सुमन अविनाशला सातत्याने टॉर्चर करत होती. आपण कधी तुझ्या घरी तर कधी माझ्या घरी राहू, तू त्यांना माझं तुझ्या आयुष्यातलं महत्त्व पटवून दे. मी तुझ्याशिवाय, तू माझ्याशिवाय राहणार नाहीस, हे सगळ्यांना ठणकावून सांग. मी इतकी वर्षे तुझी साथ दिली तर तू पण मला शेवटपर्यंत साथ दे. तुझी आधीची बायको आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. ती असू दे पण मला पण तुझ्या घरात स्थान दे. माझ्या मुलांना तू तुझी मुलं म्हणून प्रेम दे, वडिलांचं प्रेम मिळू दे, तुझी माझी मुलं एकत्र राहतील. अविनाशसाठी अशक्य असणाऱ्या मागण्या सुमन सतत करत होती. अविनाशला यामुळे प्रचंड दडपण आलेलं होतं.
सुमन समाजात वावरताना, बाहेर कुठेही कोणी तिचं नाव विचारलं तर सरळ तिच्या नावाला अविनाशचं नाव, आडनाव जोडून सांगत होती. मी अविनाशची बायकोच आहे, असं उत्तर ती राजरोस कोणालाही देत होती. आजकाल सुमन अविनाशचे फोटो डीपीला ठेवणे, दोघांचे एकत्र फोटो असल्यास ते स्टेटसला ठेवणे, समाज माध्यमातून दोघांचे फोटो पोस्ट करणे असे प्रकार करत होती. अविनाशचं कुटुंब यामुळे खूप व्यथित होत होतं. बाहेर वावरताना विधवा असूनही सुमन एखाद्या विवाहित महिलेसारखी, अविनाशची लग्नाची बायकोच असल्यासारखी उत्साहाने वागत होती. त्यामुळे अविनाशच्या कौटुंबिक आयुष्यात खूप वादळ निर्माण झाली होती.
अविनाशचं म्हणणं होतं, मला बायको-मुलं आहेत. त्यांना मी कधीच सोडणार नाही. माझ्या घरी हे सगळं चालणार नाही, याची कल्पना मी सुमनला आधीच दिलेली होती. आपलं नातं जोपर्यंत झाकलेलं आहे तोपर्यंत ठीक आहे, पण हे नातं पुढे नेण्यासाठी मी माझ्या आयुष्यात कोणतीही तडजोड करणार नाही, काहीही जोखीम घेणार नाही हे मी स्पष्ट केलं होत असं अविनाश समुपदेशनदरम्यान सांगत होता. आता माझ्या घरी सुमनवरून खूप वाद होत आहेत. माझा मोठा मुलगा हे प्रकरण वाढल्यापासून माझ्याशी बोलत नाही, तो परदेशात नोकरी शोधतो आहे. माझी मुलगी पुढील शिक्षणाचं कारण सांगून दिल्लीला निघून गेली. माझी बायको आणि आईवडील खूप तणावात आहेत. पत्नीच्या आणि मुलांच्या नजरेतून मी पूर्ण उतरलो तर ते मला कधीच परवडणार नाही. मुलांची लग्नं होणे बाकी आहेत, मला भरपूर नातेवाईक आहेत, आईवडील वयोवृद्ध आहेत कृपया यातून काहीतरी मार्ग काढ.
अविनाश आणि सुमन या प्रकरणात नेमकी चूक कोणाची, कोणा कोणाला आणि किती त्रास , किती जण या प्रकरणामुळे दुखावले गेले, सगळेच यातून व्यवस्थित बाहेर पडतील का, परत सगळ्यांच्या आयुष्याची घडी नीट बसेल का? यातून कोणी काही चुकीचे पाऊल उचलले तर काय? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झालेले होते.