Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखपुढील वर्षी लाल किल्ल्यावर मोदीच तिरंगा फडकवणार...

पुढील वर्षी लाल किल्ल्यावर मोदीच तिरंगा फडकवणार…

देशाच्या ७७व्या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून भाषण करताना पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मधील स्वातंत्र्य दिनाला आपणच लाल किल्ल्यावरून भाषण करणार आणि देशाच्या प्रगतीचा व सामर्थ्याचा आलेख मांडणार, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सलग १०व्या वर्षी राजधानीतील लाल किल्ल्यावर देशाचा तिरंगा फडकवला आणि यापुढेही आपणच फडकवणार असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावरून भाषण करताना २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा अजेंडाच निश्चित केला. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी जनतेचे सहकार्य मागितले आणि आशीर्वादही मागितले. पुढील पाच वर्षे देशाचा अभूतपूर्व विकास होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदींनी आपल्या भाषणात कुणाचे नाव न घेता विरोधी पक्षांवर धारदार टीका केली. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण यांच्याविरोधात आपला संघर्ष चालूच राहील, असे त्यांनी जनतेला आवर्जून म्हटले. मोदींनी आपल्या भाषणात गेल्या

९ वर्षांत त्यांच्या सरकारने देशाच्या सार्वांगीण विकासासाठी काय केले, त्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. आपल्या भाषणात त्यांनी मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख केला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेकांना प्राण गमवावे लागले, माता-मुलींच्या अब्रूशी खेळ खेळला गेला. पण गेल्या काही दिवसांपासून शांतता निर्माण होत आहे. सारा देश मणिपूरच्या रहिवाशांसोबत आहे, असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून दिला. मणिपूरच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य मिळून आम्ही प्रयत्न करू, असेही त्यांनी म्हटले.

देशातील १४० कोटी जनतेला डोळ्यांसमोर ठेवूनच मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. हे त्यांचे मनोगत होते. देशाचा नेता म्हणूनच नव्हे, तर देशाचे पालक आणि देशाचे कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांनी आपले भाषण केले. मोदींनी देशवासीयांना तीन मोठी आश्वासने दिली आहेत. (१) देशाची अर्थव्यवस्था येत्या ५ वर्षांत जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. (२) शहरी भागात भाड्याने राहणाऱ्या जनतेला बँक कर्जात सवलत मिळेल आणि (३) देशभरात २५ हजार जनऔषधी केंद्रे उघडण्यात येतील, सध्या ती १० हजार आहेत. सन २०१४ मध्ये जवळपास तीस वर्षांनी जनतेने एका राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत देऊन केंद्रात सरकार स्थापनेचा जनादेश दिला होता. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने देशाला मजबूत सरकार दिले. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेने पुन्हा भाजपला भरभक्कम बहुमत दिले व पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सरकार स्थापन झाले. गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने वेगाने सुधारणा केल्या व त्याची नोकरशहांनी अंमलबजावणीही तेवढ्याच वेगाने केली.

‘सबका विकास, सबका साथ, सबका विश्वास’ हा मंत्र घेऊनच मोदींनी सरकार चालविल्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही त्यांच्या दैनंदिन जीवनात झालेला व होत असलेला सुखकारक बदल अनुभवायला मिळाला. २०२४ नंतरच्या पाच वर्षांत मोदींना भारत अधिक प्रगतिशील, सामर्थ्यवान बनवायचा आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठीच त्यांनी देशवासीयांना सहकार्याची हाक दिली आहे. देशाने काय साध्य केले, देशाचे सामर्थ्य, आपले संकल्प, प्रगती, मिळालेले यश व प्राप्त झालेला गौरव हे पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाला आपण लाल किल्ल्यावरून सांगू, असा आत्मविश्वास मोदींनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. लोकसभेत झालेल्या अविश्वास दर्शक ठरावावर भाषण करताना मोदींनी २०२४ च्या निवडणुकीत आपण व आपला पक्ष यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून प्रचंड यश संपादन करणार असे सांगितले होते, तोच सूर त्यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून सतत जाणवत होता.

नवीन संसद भवन उभारण्याची चर्चा गेली अनेक वर्षे चालू होती. पण केंद्रात आलेल्या सरकारमधील कोणत्याच पक्षाने त्याविषयी निश्चित भूमिका घेतली नाही. पंतप्रधान मोदींनी मात्र अत्यंत कालबद्ध योजना आखून भव्य व अत्याधुनिक व सुखसोयींनी युक्त असे भव्य संसद भवन उभारले आणि त्याचे उद्घाटनही केले. मोदी नुसते घोषणा करून किंवा आश्वासने देऊन कधीच थांबले नाहीत, तो त्यांचा स्वभाव नाही. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी विरोधी पक्षाच्या अनेकांनी बहिष्कार घातला होता, याची त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून आठवण करून दिली. चांगल्या कामात विरोधी पक्ष सरकारला कसे सहकार्य करीत नाही, त्याचे ज्वलंत उदाहरण होते. मी आपल्यापैकीच एक आहे, आपल्यामधूनच मी इथे पोहोचलो आहे, मी आपल्यासाठीच काम करीत आहे, मी परिश्रम करतो, ते आपल्यासाठीच असे त्यांनी देशातील जनतेला सांगून देशवासीयांची मने जिंकली, म्हणूनच मोदी हे इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे, नि:स्वार्थी आणि श्रेष्ठ आहेत.

सन २०४७ मध्ये भारताचा १००वा स्वातंत्र्य दिन साजरा होईल, तेव्हा या देशाची ‘विकसित भारत’ अशी जगात ओळख निर्माण होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. येत्या १७ सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीपासून देशातील तरुणांसाठी विश्वकर्मा योजना सुरू होणार असून त्यासाठी १५ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही मोदींनी जाहीर केले. लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता हे या देशाचे वेगळेपण आहे. पण या तीनही घटकांमध्ये भारताचे स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे, हे मोदींनी ओळखले आहे. ग्रामीण भागात २ कोटी भगिनी लखपती व्हाव्यात, असे आपले स्वप्न असल्याचे सांगून महिलांविषयी आपणास आदर असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -