विभिषिका दिनाच्या दुर्दैवी कहाणीचे स्मरण का?

Share

रवींद्र मुळे : नगर

कै. अटलजी यांनी एका काव्यात म्हटले आहे,
‘कलकत्ता के फूटपाथो पर जो आंधी, पानी सहते है जाकर पूछो उनको, १५ ऑगस्ट के बारे मे वो क्या कहते है!’

दुर्दैवाने आम्ही कलकत्त्यापासून आमच्या गावात कुठेही आमच्या फाळणीच्या काळातील विस्थापित बंधूंची चौकशी, विचारपूस केली नाही. वास्तव समजून घेतले नाही. भारतभर जेथे रेल्वे स्टेशन होते, तेथे आमचे हे विस्थापित बंधू पोहोचले. स्वकर्तृत्वावर विस्थापित न राहता प्रस्थापित झाले.
आम्ही स्वातंत्र्याच्या आनंदात इतके मश्गूल झालो की, अटलजी यांच्याच दुसऱ्या काव्यपंक्ती आम्ही खऱ्या ठरवल्या. त्यांनी म्हटले होते,

‘जो पाया उस मे खो न जाये, जो खोया उसको
ध्यान करे’!
स्वातंत्र्याचा आनंद सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांना होणे स्वाभाविकच होते; पण स्वातंत्र्य मिळवण्यापोटी आम्ही काय नुकसान सहन केले? हे आम्ही कधी विचारातच घेतले नाही. परिणामस्वरूप स्वतंत्र झाल्यावरही आमच्याच देशात आमच्याच काश्मिरी बंधूंना विस्थापित शिबिरात राहण्याची वेळ आम्ही आणली. खरा इतिहास समजून घेणे आणि तो इतिहास न विसरता त्यातून काही शिकणे, हे न केल्याचे परिणाम आज आम्ही देशात विविध ठिकाणी फुटीर गट करत असलेल्या कारवायांच्या रूपाने बघत आहोत. सांस्कृतिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने एकात्म असलेल्या या भारत वर्षात शासक आणि शासन वेगवेगळी असली, भाषा, खान-पान यात विविधता असली तरी सर्वांची राष्ट्र म्हणून समान आकांक्षा होती. समानपूर्व गौरव होते. समान शत्रू होते आणि त्यामुळेच शक, कुशाण, ग्रीक आक्रमण आम्ही पचवले आणि त्यांना येथील संस्कृतीत संमिलित करून घेतले. दुर्दैवाने खैबर खिंडीतून आणि नंतर अन्य उत्तर, पश्चिम भागातून आलेले मुस्लीम आक्रमण आम्ही समजून घेण्यात अपयशी ठरलो आणि त्यातून एक एक भूभाग गमावून बसलो. थेट इराणशी जोडलेल्या आमच्या सीमा संकुचित होत गेल्या. गांधार गमावले, ब्रह्मदेश गमावले आणि इंग्रज शासनाकडून स्वातंत्र्य मिळवताना बंगाल, सिंध, पंजाब गमावले. जणू काही प्रधानमंत्र्यांनी वर्णन केल्याप्रमाणे भारत मातेच्या हाता-पायातील बेड्या काढण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही म्हटल्यावर, त्या भारत मातेच्या भुजाच आमच्या त्या वेळच्या नेतृत्वाने कापून काढल्या.

१९४७ साली झालेले देशाचे विभाजन ही एक मोठ्या विमर्शचा अटळ परिणाम आहे. अलिगढ विद्यापीठाची स्थापना, सर सय्यद अहमद खान यांनी मांडलेला द्विराष्ट्रवाद सिद्धांत, बंगालच्या फाळणीचा १९०६चा प्रयोग, १९१६ चा लखनऊ करार (मतदारसंघात मुस्लीम राखीव जागा मान्यता), १९२० चा खिलापत प्रयोग, वंदे मातरमला विरोध, लीगचा उदय, डायरेक्ट action चा जीनांचा आदेश आणि हिंदूंचा आमच्या नेत्यांवर असलेला अंधविश्वास या सर्वांची परिणीती म्हणजे फाळणीचा कटू प्रसंग आहे. याला दुसरी एक विमर्शची बाजू आहे, ती म्हणजे हिंदू समाज जीवनाला शिक्षणाच्या माध्यमातून संभ्रमित केले गेले जाण्याची. फाळणीमुळे काय नुकसान होणार आहे, हे समजण्यासाठी आवश्यक असणारी संवेदनशील मने या शिक्षणाने मारून टाकली. भारत हे कधीच एक राष्ट्र नव्हते, त्यामुळे ‘नेशन इन मेकिंग’ हा भ्रम पसरवला गेला. या भ्रमात आम्ही आमचा इतिहास विसरलो.

इतिहास विसरण्याची ही प्रक्रिया दुर्दैवाने स्वातंत्र्यपूर्व काळात तर होतीच, पण उत्तर काळात आहे तशी चालू राहिली. आता ही प्रक्रिया काँग्रेसच्या मलिद्यावर पोसणाऱ्या डाव्यांनी चालू ठेवली आणि त्यामुळे सगळाच इतिहास विकृत पद्धत वापरून मांडला गेला. विद्यापीठे आणि प्रशासन यामधून खरा इतिहास विसरून खोटा इतिहास पसरवला गेला. त्यातून निर्माण झालेले गंभीर परिणाम आज आपण भोगत आहोत. स्वातंत्र्य मिळाल्यावर काही महिन्यांत आम्ही काश्मीरचा भूभाग गमावला. आसामचा भाग आम्ही गमावण्याच्या अवस्थेत असताना आमच्या प्रधानमंत्र्यांनी ‘My heaurt goes with Aasam people’ असे म्हणून शेवटचा निरोप दिला होता.

लडाखमधील काही भाग चीनने रस्ता करण्यासाठी वापरायचे ठरवले, तर त्या भागात गवताचे पाते पण उगवत नाही, हे नेहरू यांचे उत्तर होते. ६२ च्या युद्धात चीनने आमचा भूभाग हडप केला. भारत मातेच्या ललाटी विभाजनाचा अभिशाप संपत नव्हता. गेलेले परत मिळणे तर दूर राहिले. आम्ही एक एक भाग गमावत राहिलो. अगदी दुर्गा म्हणून गौरव केलेल्या इंदिराजी यांनी दक्षिणेतील एक बेट श्रीलंकेला बहाल केले. हे शांतपणाने आम्ही सहन करत होतो. आजही करत आहोत, याचे मुख्य कारण आम्ही जो इतिहास शिकायचो तो शिकलो नाही, किंबहुना तो विसरलो. आम्ही सिंधच्या राजा दाहीरचा आणि त्याच्या दोन कन्येचा पराक्रम विसरलो. आम्ही पृथ्वीराज चौहान याला मोहम्मद घोरी याने दिलेल्या यातना विसरलो. आम्ही राणा प्रताप यांस अकबराच्या मुळे भोगावा लागलेला वनवास विसरलो.

सोमनाथ मंदिराचा गझनीने केलेला विध्वंस विसरलो. बाबराने तोडलेले राम मंदिर विसरलो. औरंगजेबाने मथुरा आणि काशी विश्वनाथ यांचे केलेले विध्वंस विसरलो. आम्ही कृष्ण देवराय याचे मुंडके गटारीला जोडणारा अल्लाउद्दीन खिलजी विसरलो आणि धर्मवीर संभाजी राजे यांचे बलिदान पण विसरलो. टिपूचे क्रौर्य विसरलो आणि आमच्या योद्ध्यांनी लढताना गाजवलेले शौर्यही विसरलो. त्यामुळे आम्हाला भक्त प्रल्हाद यांच्या भक्तीने जेथे नरसिंह प्रकट झाले, त्याचे मंदिर मुलतानमध्ये आहे आणि जे आज पाकिस्तानात आहे, याचे दुःख नाही. लाहोर हे शहर आमच्या प्रभू रामचंद्राच्या लव या मुलाची राजधानी याचे सहज विस्मरण आम्हाला झाले. शीख पंथाची स्थापना झालेले ऐतिहासिक स्थळ भारतात नाही, याची कुठलीच खंत आम्हाला त्यामुळे नाही. भगतसिंग यांचे जन्मस्थळ आम्ही बघू शकत नाही. यामुळे आमचे मन विषण्ण होत नाही कारण विसरलेल्या आणि चुकीच्या शिकलेल्या इतिहासाने आमची मने ही दगडासारखी झाली आहेत.

फाळणीच्या त्या अंधकारमय वातावरणात त्यावेळी सुमारे २५ लाख लोकांचे विस्थापन झाले. पाच ते दहा लाख लोकांना जीव गमवावा लागला. अनेकांना आपल्या स्त्रियांवर डोळ्यांसमोर झालेले अत्याचार सहन करावे लागले. हजारो धर्मांतरे झाली. जगाच्या पटलावर हे अत्याचार आम्ही कधी आणू शकलो नाही, वाचा फोडू शकलो नाही. याचे कारण म्हणजे त्या वेळच्या आमच्या राज्यकर्त्यांना ते परवडणारे नव्हते. पण आता वेळ आली आहे. इतिहासाच्या आड दडलेली काही पापे, काही कारस्थाने, काही ठरावीक लोकांच्या क्षुद्र महत्त्वाकांक्षा यांनी लक्षावधी लोकांचे जीव गेले. अनेकांना जबरदस्तीने धर्म बदलावे लागले. भारतमातेचे तुकडे झाले, हे विभिषिका दिनाच्या निमित्ताने लक्षात घ्यावे लागेल. हे सत्य समजून घेताना पाषाणवत झालेल्या समाजमनाला सचेतन करण्याची गरज आहे. प्रयत्न केल्यावर पाषाणातून पाणी निघते, मग आम्ही तर माणसे आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. विभाजनाच्या कटू आठवणी यासाठी जपायच्या की, कधी काळी आम्ही गमावलेला आमचा भूभाग आम्ही पुन्हा मिळवू यासाठी. ही आकांक्षा बाळगण्यात कुठेही स्वप्नरंजन नाही. कारण मुळात फाळणी ही अनैसर्गिक आहे हे सत्य आहे. या अखंड भारतात पूजा पद्धत कुठलीही असली तरी त्याला स्वातंत्र्य होते आणि ते राहणारच आहे. पण दुसऱ्यांना अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न आता खपवून घेतला गेला नाही पाहिजे. आज भारतात निर्माण झालेले ‘लव्ह जिहाद’, land जिहाद, दहशतवाद या सर्व प्रश्नांचे उत्तर अखंड भारत संकल्पनेत सामावलेले आहे. यात कुठलाही वसाहतवादी दृष्टिकोन नाही; तर आम्ही गमावलेला आमचा भूभाग परत मिळवण्याचा नैसर्गिक अधिकार आहे.

विभिषिका दिन हा एका अर्थाने अखंड भारतासाठी संकल्प करण्याचा दिवस आहे. हे स्मरण नाही, तर आमची राष्ट्राप्रती ही वचनबद्धता आहे. ज्या हिंदू समाजाने स्वतंत्र भारतात आपण सुखी राहावे म्हणून प्राण गमावले, स्वकीय, कुटुंबीय, जमीन-जुमला गमावला, प्रतिष्ठा गमावली त्यापैकी आज कुणी जिवंत नाहीत. त्यांची पुढील पिढी पण आता वयोवृद्ध झाली आहे. पण आज त्यापैकी जे सिंधी, पंजाबी, शीख बंधू आहेत, त्यांच्या तरुण पिढीला आशवस्थ करण्यासाठी विभिषिका दीन आहे. अखंड भारत संकल्प दिन आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. सुदैवाने आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी, युरोप, इंग्लंडमध्ये घडत असलेले प्रसंग यातून काही देशांना भारताला गेल्या हजारो वर्षात काय भोगावे लागले आहे, याची कल्पना आलेली आहे. त्यामुळे एक जो न्यूनगंड अखंड भारत या संकलप्नेत अनेकांना वाटत होता, तो कमी व्हायला हरकत नाही. खुद्द पाकिस्तानातील सिंध, बलूची पंजाब प्रांतात अस्वस्थता वाढत आहे. श्रीलंकेची स्थिती आपल्याला माहीत आहेच. संघराज्य पद्धत स्वीकारून भारतीय उपखंड म्हणून भविष्यात भारताचे नेतृत्व स्वीकारण्याची मानसिकता हळूहळू निर्माण होत आहे.

विभिषिका दिन म्हणजे फाळणीच्या काळातील अत्याचाराची केवळ आठवण एवढा मर्यादित अर्थ न घेता, तो संकल्पाचा दिवस आहे. तो गमावलेल्या आमच्या सांस्कृतिक वारसा परत मिळवण्याचा दृढसंकल्प करण्याचा दिवस आहे. याबाबतीत ज्यू समाजाचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. अनेक वर्षे आपला भूभाग हरवलेल्या या समाजाने आपले राष्ट्र उभे करून दाखवलं ते पण अरब देशांच्या नाकावर टिच्चून! हिब्रू ही त्यांची राष्ट्र भाषा ! एकेकाळी जगात मृत झालेली ही भाषा आता पुन्हा जिवंत केली ज्यू समाजाने आपल्या जिद्दीवर! ते यशस्वी झाले त्या मागे होती प्रखर राष्ट्रभावना! याच राष्ट्र भावनेचा जागर हा आमच्या विभिषिका दिनाचा उद्देश आहे. त्यासाठी कृतीबद्ध होऊ या. देशाच्या अमृत काळात अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल, या अपेक्षेने विभीषिका दिनाकडे बघू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Pune Crime : पैसे परत न केल्याने शिक्षित डॉक्टरने कोयता हाती घेत केला तरुणाचा खून!

गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…

1 hour ago

Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!

बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…

2 hours ago

Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक

तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक…

2 hours ago

Britain government : ब्रिटनमध्ये सत्ताबदल! ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव

आता 'हे' असणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) काल म्हणजेच ४ जुलै रोजी…

2 hours ago

Cycle Wari : पंढरीच्या वारीसाठी नाशिककरांची सायकलस्वारी!

एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी…

3 hours ago

Virat Kohli : सेलिब्रेशननंतर विराट कोहली तडक निघाला लंडनला! काय आहे कारण?

मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची…

4 hours ago