Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखप्रगतीचा महामेरू

प्रगतीचा महामेरू

आज भारतीय स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन साजरा होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ७५ वर्षे पूर्ण झाल्यालाही आज एक वर्ष लोटले आहे. त्यानंतर इतक्या वर्षांत भारताने अफाट प्रगती केली आहे, हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. इंग्लंडसारख्या राष्ट्राला अर्थव्यवस्थेत मागे टाकून भारताने पाचवा क्रमांक पटकावला आहे. व्यापाराच्या बाबतीत भारत आज सर्वांच्या पुढे आहे आणि भविष्य तर प्रचंड उज्ज्वल आहे. असे म्हणतात की, २०४७ मध्ये भारताचा क्रमांक जगात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून असेल. जो देश केवळ हत्ती आणि सापांचा म्हणून ओळखला जात होता, त्या देशासमोर आज अर्धे जग नतमस्तक होत आहे, यावरून देशाने किती प्रगती केली आहे, याचा अदाज यावा. याचे श्रेय अर्थातच निःसंशय पंतप्रधान मोदी यांचेच आहे. काँग्रेस सरकारांच्या काळात प्रगती झाली नाही, असे नाही. इंदिरा गांधी यांनी केवळ ‘गरिबी हटाव’च्या घोषणा दिल्या. प्रत्यक्षात गरिबी हटलीच नाही. गरीबच हटले, असे तेव्हा विनोदाने म्हटले जाई. ते शब्दशः सत्य होते. पण मोदी सरकारच्या काळात कोणत्याही घोषणा न करता प्रचंड प्रगती झाली आहे, हे निष्ठावंत काँग्रेसजनही नाकारू शकणार नाहीत.

भारतात एकेकाळी अन्नधान्याचा तुटवडा होता. अधिक धान्य पिकवा, अशा घोषणा सरकारी पातळीवरून दिल्या जात होत्या. देशाला ‘मिलो’ नावाचा सडका गहू अमेरिकेकडून आयात करावा लागत होता. आज ती परिस्थिती होती, असे सांगितले तर नव्या पिढीला विचित्र वाटेल. अन्नधान्य आयात करण्याची वेळच आज भारतावर नाही. अन्न महामंडळाची कोठारे धान्याने ओसंडून वाहत आहेत आणि परिणामी लोकांना धान्याचा तुटवडा भासण्याचे कारणच पडत नाही.

देश आज सर्वच बाबतीत विशेषतः संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ ही घोषणाच मोदी यांनी दिली आहे आणि प्रत्येक देशवासीयांनी ती मनावर घेतली आहे. परिणामी आज भारत उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. पूर्वी केवळ उद्योगपती म्हटले की, टाटा आणि जी. डी. बिर्ला अशी दोनच नावे समोर यायची. आजही जुन्या लोकांच्या तोंडी हीच नावे येतात. पण आज अदानी-अंबानींसह कित्येक उद्योगपती देशाचे नाव जगाच्या नकाशावर फडकवत आहेत. कित्येक उद्योगपती जगाच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत म्हणजे फोर्ब्स यादीत आहेत. त्यात महिलाही आहेत. भारताची सर्वात मोठी प्रगती म्हणजे भारत आज अण्वस्त्र सज्ज आहे. पाकिस्तानच काय पण कोणतेच राष्ट्र आज भारताकडे वाकडे डोळे करून पाहू शकत नाही. एकदाच पंडित नेहरूंच्या भोळसटपणामुळे भारताला १९६२ साली पराभव पत्करावा लागला होता. पण आज भारताकडे शक्तिशाली अस्त्रे आणि प्रचंड अण्वस्त्रसाठा आहे. जो देशाकडे वाकडा डोळा करून पाहणाऱ्या चीनमधील शहरेही बेचिराख करू शकतो. शांतता ही बळाच्या सामर्थ्यावरच टिकू शकते, हा धडा भारत शिकला आहे. त्यामुळे आज पाकिस्तानसह कुणाही देशाची भारताला त्रास देण्याची हिंमत नाही.

भाजपचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात देशाने अणुचाचण्या घडवल्या. त्यातून भारताने देशाची सुरक्षा कायमची सुनिश्चित केली आहे. मध्यंतरी कोरोनाने देशाच्या प्रगतीत अडथळा आणला. पण भारताने लसी उपलब्ध करून त्यावरही मात केली. आज जगातील अनेक देशांना भारताने लसी पुरवल्या आहेत. भारताचे पंतप्रधान मोदी यांना सारे जग मानते. इतके की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात मोदी यांची मध्यस्थी मानण्याची तयारी दोन्ही देशांनी दर्शवली आहे. ही आंतरराष्ट्रीय बाबतीत भारताची प्रगतीच आहे. शिक्षण, आरोग्य, बुद्धिमत्ता आणि कोणतेही क्षेत्र नाही की, ज्यात भारताने प्रगती केलेली नाही. दहशतवादावर भारताने मात केली आहे. २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर तसा हल्ला करण्याची हिंमत कोणत्याही अतिरेकी संघटनेची झालेली नाही. इतकेच नव्हे, तर मोदी आणि शहा यांच्या सरकारने पाकिस्तानव्याप्त कश्मीरमध्ये बालाकोट येथे हवाई हल्ले घडवून कित्येक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. असा प्रति हल्ला कोणत्याही सरकारच्या काळात झाला नव्हता. काँग्रेसचे सरकार केवळ निषेधाचे खलितेबाज सरकार होते. पण आता तसे नाही.

पाकिस्तानही हे समजून चुकला आहे. मोदी सरकारने राम मंदिराचा प्रश्न सोडवला. नेहरूंच्या शेख अब्दुल्ला प्रेमापोटी राखण्यात आलेले ३७० कलम मोदी यांनी रद्द करून दाखवले. आता काश्मीरला स्वतंत्र दर्जा नाही. काश्मिरींचे लाड आताच चालणार नाहीत, हेच मोदी यांनी दाखवून दिले. समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण आता श्रीनगरमध्येही तिरंगा फडकवला जातो. काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला सदरे रियासत म्हणजे पंतप्रधान म्हणण्याचे लाडही थांबले आहेत. अशी कितीतरी पावले आहेत की, जी मोदी सरकारने उचलली आहेत. त्यांना क्रांतिकारक म्हणता येईल. भारताने अणुचाचण्या घेतल्या आणि त्यानंतर आता पाकिस्तानसह चीनही आता भारताकडे वाकड्या डोळ्याने पाहू शकणार नाही. याच जोडीला डिजिटल क्रांती झाली आहे.

पेमेंट सारे ऑनलाइन केले जातात आणि रोकड व्यवहार तर जवळजवळ थांबलेच आहेत. त्यातून लोकांचा वेळ आणि मेहनत कितीतरी वाचते. यामुळेही मोदींना कित्येक कोटी देशवासी धन्यवाद देत आहेत. पोलिओचे उच्चाटन झाले आहे आणि कोणताही रोग आता देशवासीयांना आपापल्या जाळ्यात सापडवू शकणार नाही. हरित क्रांती होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला ही प्रगती इतर कोणत्याही प्रगतीच्या बाबतीत कमी नाही. एकाचवेळी आज देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपर्ण आणि संरक्षणाच्या बाबतीतही स्वयंपूर्ण झाला आहे. ही दुहेरी प्रगती आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -