
राऊतांच्या कोकणातल्या उपोषणावर नारायण राणे आक्रमक
नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपल्या आक्रमक शैलीसाठी सर्वांना परिचीत आहेत. त्यांनी आज अत्यंत आक्रमकतेने ठाकरे गटाचे (Thackeray gat) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. विनायक राऊत हे कोकणातील प्रश्नावर उपोषण करीत आहेत. याबाबत नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी राऊतांची औकातच काढली.
नारायण राणे म्हणाले की, कोण विनायक राऊत? काय औकात आहे त्यांची? गेल्या १० वर्षांत त्यांनी काही योजना आणली का? असा सवाल करत उपोषण काय करता त्यांना हवी असेल तर बिर्याणी पाठवतो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.
शरद पवार (Sharad Pawar) कृषीमंत्री होणार का? याबाबत विचारले असता, तो माझा विषय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)त्यावर बोलतील, असे नारायण राणे यांनी सांगितले.
काँग्रेसचे काही आमदार भाजपकडे येणार
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून काँग्रेस आणि ठाकरे गट भाजपविरोधात एकत्र येतील का? अशी विचारणा केली असता राणे म्हणाले की, दोन्ही पक्ष मिळून आणि ३६ जण एकत्र येऊन काही फायदा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तिघे होते तरी ते काही करू शकले नाहीत. आता कमी जास्त झाले, तरी काही होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात काँग्रेसचे काही आमदार भाजपकडे येणार आहेत, त्यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. भविष्यात काँग्रेस व ठाकरे गटाकडे फारसे आमदार राहणार नाहीत, असा दावाही नारायण राणे यांनी या वेळी बोलताना केला.
कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना
आज देशाचा स्वातंत्र्य दिन असून देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाच्या प्रगतीबद्दल, सर्वांच्या विकासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. त्यासोबतच कारागिरांच्या प्रगतीसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे, असेही राणे यांनी सांगितले.