
निवारा केंद्रांची केली पाहणी
पुढील सहा महिन्यांत पक्की घरे बांधून देणार
रायगड : आज स्वातंत्र्यदिनी (Independence day) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील भूस्खलन (Irshalwadi landslide) दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत दाखल झाले. या ठिकाणी जाऊन त्यांनी निवारा केंद्राची पाहणी केली. येथील सर्व बचावलेल्या लोकांची कंटेनर्समध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना लवकरच पक्की घरे बांधून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आजचा स्वातंत्र्यदिन त्यांनी इर्शाळवाडीतही साजरा केला.
इर्शाळवाडी दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या ४२ कुटुंबांची मुख्यमंत्र्यांनी यावेळेस भेट घेतली. या कुटुंबांशी, येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना व्यवस्थित खायला मिळतंय का, राहण्यात काही अडचणी येत नाहीत ना, या सगळ्याची मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून या कालावधीत सरकारने सर्वांच्या बचावासाठी प्रगतीपथावर काम केलं आहे.
इर्शाळवाडीचं पुनर्वसन करण्यासाठी इर्शाळगडाच्या बाजूलाच असलेली पाच एकरची जागा देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यांत सिडकोच्या माध्यमातून त्या ४२ कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या तरुण व शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला, तरुण यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.