
ड्रग्ज आलं कुठून?
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनार्यावर (Murud beach) काल दुपारी चार वाजताच्या सुमारास एका बेवारस पोत्यामध्ये ४० लाख रुपये किंमतीचं चरस आढळल्याची एक खळबळजनक बाब समोर आली आहे. पोलिसांनी हे पोतं उघडून पाहिलं असता त्यात १,१५० ग्रॅम वजनाची १५ चरसची पाकिटे आढळून आली.
पोलियांना या पोत्यात अमली पदार्थ असल्याचा संशय होताच त्यामुळे पोलिसांनी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथक मुरुडला दाखल झाल्यावर तपासणी करण्यात आली. त्यातून ही चरसचीच पाकिटे असल्याचं स्पष्ट झालं. पंचासमक्ष पंचनामा करून पाकिटे जप्त करण्यात आली.
पोलीस निरीक्षक आहिरे यांनी ही पाकिटे भिजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती दिली. अशाच प्रकारचे पाकीट सौराष्ट्र (गुजरात) समुद्रकिनारी मिळाले असल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, मुरुडच्या समुद्रकिनार्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आलं कुठून याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.