कमी पावसामुळे राज्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता
कोल्हापूर : माझा शेतकरी, कष्टकरी वाचला पाहिजे म्हणून सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. कांदा उत्पादकांसाठी सरकारनं साडेपाचशे कोटी मंजूर केले आहेत. शिवाय, शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरु केली आहे. जगाच्या इतिहासात अशी योजना कोणीही सुरु केली नव्हती, ती योजना आपण आपल्या राज्यात सुरु केली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बरा असला तरी, पिकांना जेवढा पाऊस हवा होता, तेवढा मिळाला नाही. आज देखील आपल्या राज्यातील काही भागात टॅंकर सुरु करावे लागताहेत. ऑगस्टअखेरपर्यंत आणि सप्टेंबरमध्ये राज्यात पाऊस व्हायला हवा, अन्यथा भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. मात्र राज्य सरकार सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे आणि योग्य उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.