
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात मुसळधार
मुंबई : उशीरी आलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस गायब झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे.
राज्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यानंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी ऊन वाढले आहे. काही ठिकाणी अपुरा पाऊस झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.
13 Aug, IMD मॉडेल मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्रात 18 ते 24 आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता, विदर्भातील काही भागात आणि शेजारील, आणि शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात शक्यता दिसते.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे, पण स्पष्ट नाही. pic.twitter.com/JkPsOdpck4
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 13, 2023
पावसाचे पुढच्या आठवड्यात पुनरागमन होणार असल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात ही स्थिती पुढील आणखी काही दिवस राहणार आहे. १८ ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
राज्यात १८ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भातील काही भागात होणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाऊस कमबॅक करु शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितले आहे.
मुंबईत देखील सामान्य पाऊसमान राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. सध्या मुंबईत पावसाची एखाद दुसरी सर होत असून पुढील सात दिवस हीच स्थिती राहणार आहे.