पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर लोकांना सोशल मीडियावरील डीपी बदलून राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशाप्रतिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी जनतेला हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्वीट करुन देशासोबतचे नाते अधिक दृढ करण्यासाठी जनतेला हे पाऊल उचलण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “हर घर तिरंगा मोहिमेच्या भावनेनुसार, आपण आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा डीपी बदलूया आणि देशासोबतचं आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठी योगदान देऊया.” स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियावरील अकाऊंटचा डीपी बदलला असून आता त्यांच्या डीपीवर तिरंगा ध्वजाचा फोटो आहे.
यंदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात १,८०० विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. एका अधिकृत प्रकाशनात म्हटलं आहे की, “पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित केलेल्या १,८०० विशेष पाहुण्यांमध्ये जल जीवन मिशन, पीएम किसान सन्मान निधी योजना, अमृत सरोवर योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प यासारख्या विविध प्रमुख कार्यक्रमांशी संबंधित लोकांचा समावेश आहे.”