दुस-या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा घरामध्ये गाडला गेल्याने मृत्यू
शिमला : मुसळधार पावसाने हिमाचल प्रदेशात (Landslide in Shimla) हाहाकार उडाला आहे. सोलन जिल्ह्यात काल रात्री झालेल्या भूस्खलनात चार मुले आणि एका महिलेसह एकाच कुटुंबातील सात जणांचा घरामध्ये गाडला गेल्याने मृत्यू झाला. तर आज शिमल्यात शहराच्या बाहेरील बायोलेगंजजवळील शिव मंदिरावर दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ९ जणांचा मृत्यू झाला तर २५-३० भाविक जिवंत गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, आज श्रावण सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते. सोमवारी विशेष प्रार्थनेसाठी सातशेच्या सुमारास भाविक मंदिरात जमले होते. त्याचवेळी रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तोटू-शिमला रेल्वे मार्गाजवळ अंदाडी मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मंदिराला धडक दिली.
WATCH | Shimla’s Summer Hill area hit by landslide; few people feared dead, operation underway to rescue stranded persons
CM Sukhvinder Singh Sukhu and state minister Vikramaditya Singh are on present on the spot pic.twitter.com/sjTLSG3qNB
— ANI (@ANI) August 14, 2023
या दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय राखीव दल तैनात करण्यात आले होते. सोमवारी पहाटे विशेष प्रार्थनेसाठी भाविक खीर प्रसाद तयार करण्यात व्यस्त असताना ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, समरहिल आणि बोइलुगंज दरम्यानच्या शिव बौडी भागात भूस्खलन झाले ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून २५-३० लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे. बाधितांची स्थिती अद्याप अस्पष्ट असली तरी आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
दरम्यान, काल दुस-या एका घटनेत सोलन जिल्ह्यातील कंदाघाट तहसील अंतर्गत जादोन गावात रात्री झालेल्या भूस्खलनात चार मुले आणि एका महिलेसह एकाच कुटुंबातील सात सदस्यांचा घरामध्ये गाडला गेल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये रतीराम यांचा मुलगा हरनाम त्याची दोन मुले, मृत हरनामची पत्नी, नातू आणि रतीराम यांचा जावई यांचा समावेश आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, गेल्या २४ तासांत झालेल्या विनाशकारी पावसामुळे राज्यात मृतांची संख्या वाढली आहे. राज्यातील मृतांचा आकडा २६४ वर गेला आहे. राष्ट्रीय महामार्गासह सुमारे ५०० रस्ते वाहून गेले आहेत आणि भूस्खलन आणि महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नदीकाठच्या अनेक भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात पाणी आणि वीजपुरवठा खंडित झाला आहे.