मुंबई : पाकिस्तानी महिला सीमा हैदर सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिनच्या प्रेमात पडली. तिने भारतात येऊन सचिनसोबत संसारही थाटला. सीमा-सचिनच्या या प्रेमकथेवर आधारीत चित्रपट काढण्याचा संकल्प केल्यानंतर या चित्रपटावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसेने या चित्रपटाला विरोध केला आहे. हा चित्रपट बनवणारे अमित जानी यांना धमकी देण्यात आली होती. या धमकीला आज अमित जानी यांनीही उत्तर दिले आहे. मी मुंबईत येतोय, हिंमत असेल तर हल्ला करुन दाखवा, असे अमित जानी यांनी म्हटले आहे.
मेरठचे रहिवासी आणि उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी (Uttar Pradesh Navnirman Sena President Amit Jani) हे या दोघांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. ‘कराची टू नोएडा’ नावाच्या या चित्रपटासाठी लीड फेसही फायनल झाला आहे, सुप्रसिद्ध मॉडेल फरहीन फालक या चित्रपटात सीमाची भूमिका साकारणार आहे, सचिनची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, त्या आधीच हा चित्रपट वादात सापडला आहे.
दरम्यान, मनसेचे चित्रपट विभागाचे नेते अमेय खोपकर म्हणाले होते की, ‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतेही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती आयएसआय एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!’
त्यावर अमित जानी यांनीही ‘मी थांबणार नाही, मी १९ ऑगस्टला मुंबईत येणार आहे. मनसेची हिम्मत असेल तर हल्लाबोल करून दाखवा,’ असे अमित जानी यांनी म्हटले आहे.