विशेष: अरुण घाडीगावकर
महाभारत, रामायणासारखी महाकाव्य, कालिदासाच्या ‘मेघदूत’, ‘शाकुंतलसारख्या’ वाङ्मयकृती, ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकारामगाथा’ या साहित्यकृती इतक्या अथांग आहेत की त्यांचा विविधांगांनी धांडोळा घेऊन, त्यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करूनही त्या दशांगुळं वर उरतातच… नित्य नूतन भावार्थ त्यातून अनुभवायला येतो. कित्येक पिढ्या या महाकाव्यांचं गूढ उकलण्यात गढून गेल्या. या महाकाव्यांचं आव्हान आजही आपल्या वकुबानुसार स्वीकारलं जातंय. महाराष्ट्र शासनाच्या ‘वस्तू व सेवा कर विभागा’त ‘सहआयुक्त’ या पदावर कार्यरत असणाऱ्या स्वाती काळे यांनाही ‘महाभारता’तील या गूढ महाकथा आणि त्यातील व्यक्तिमत्त्वांनी मोहिनी घातली. इंडियन मायथॉलॉजी, सौंदर्यशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र यांच्या त्या अभ्यासक आहेत. त्यामुळे ‘महाभारता’सारख्या महाग्रंथाचा अभ्यास करण्याची भुरळ त्यांना पडली नसती, तरच नवल!
स्वाती काळे यांनी ‘महाभारता’तील त्यांना वैचारिकदृष्ट्या कोडं वाटणाऱ्या प्रसंगांचा त्यातील व्यक्तिमत्त्वांच्या वागण्या-बोलण्यामागचा उद्देश, विचार, धोरण, दृष्टी यांचा विश्लेषक मागोवा घेतला आहे. त्यातून त्यांचा भारतीय पुराणांचा आणि त्याचबरोबर पाश्चिमात्य पुराणकथांचाही व्यासंग दृग्गोचर होतो. हा व्यासंग काही केवळ आपलं वाचन किती चौफेर आहे, हे दाखवणारा नसून नेमक्या वेळी नेमका संदर्भ पटकन आठवून आपल्या निष्कर्षाचं समर्थनही त्यातून त्या यथारूप करतात. उदा. तैतरीय संहितेत यमाला अग्नी आणि यमीला पृथ्वी म्हटलं आहे. यम-यमीची जोडी म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाला लाभलेली अंतर्दृष्टी आहे असंही त्या नमूद करतात. ‘महाभारत’ हा जाणीव-नेणिवेच्या पलीकडील प्रांत आहे, ते जग शब्दांच्या पलीकडचं आहे याची काळे यांना जाणीव आहे. त्याची अनुभूती मांडताना त्या म्हणतात, “गोष्टींपलीकडचं हे महाभारतच आहे. चिमुकले शब्द तुमचे बोट धरतात आणि घनगर्द राईत तुम्हाला नेऊन सोडतात. नंतरचं महाभारत घडतं ते तुमच्या हृदयात.” अशा हृदयस्थ महाभारतातील कथा-व्यक्ती-प्रसंग यांचा आपल्या व्यासंगातून त्या नवा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेशी त्या एकरूप होऊन संवाद साधतात व आपल्या आजवरच्या अभ्यासातून त्या व्यक्तिरेखेकडे पाहताना त्यांचे त्यांना जाणवलेले नवे पैलू त्या वाचकांसमोर आणतात. तसेच वर्तमान मानवजातीशी त्यांचा संदर्भ जोडून त्या व्यक्ती-घटनांचं चिरंतनत्त्व त्या स्पष्ट करतात. युद्धसमापत्तीनंतर अर्जून रथातून उतरताच रथ भस्मसात होतो. त्यावर भाष्य करताना स्वाती काळे म्हणतात, “मानवी अस्तित्वाचेही असंच असतं आयुष्याचा उद्देश संपला की बाह्य ध्वजप्रतिमा विरतात. संसाररथ जळून भस्मसात होतो.” उत्तरकुल आस्थातील देवलोकांचं वर्णन अद्भुत आहे. त्याचा वर्तमान जगण्याशी संबंध जोडताना लेखिका म्हणतात, “मानवाच्या जगण्याच्या दुर्दम्य आशेचा ते अस्थ म्हणजे एक गूढरम्य हुंकार आहे.”
‘महाभारता’तील घटनास्थळांचाही त्या खोलात जाऊन धांडोळा घेतात. तो घेत असतानाच त्यांना जाणवणारी तथ्यं त्या साम्यस्थळांच्या आधारे अधोरेखित करतात. त्यांच्या चिकित्सक वृत्तीला प्रश्न पडतात, त्यांची उत्तरही त्या आपल्या अभ्यासानं शोधतात. “महाभारतात दोन युद्धभूमी होत्या का? एक कुरुक्षेत्र आणि दुसरं खांडव वन” खांडव वनदाह पर्वाचा विचार करताना त्या म्हणतात, “समाजशास्त्रीय चष्म्यातून बघितलं, तर महाभारत काळात राज्य ही संकल्पना मूळ धरू पाहत होती… नगरं वसविण्यासाठी किंवा राज्य विस्तार करण्यासाठी अरण्य जाळण्याचा तेव्हा प्रघात असावा.” ‘गोष्टीपलीकडचे महाभारत’मधील सारे लेख वैचारिक असले तरी स्वाती काळे यांच्या संवादस्वरूप लेखनशैलीमुळे ते रोचक होतात. कधी कधी त्यांच्या निवेदनात मिष्कीलपणाही डोकावतो. अरण्यपर्वात ऋषिमुनींनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यावरचं त्यांचं भाष्य… ‘युधिष्ठिराला दिलेली ही प्राचीन काळातील अँटी डिप्रेशन पिल आहे…’ आत्यंतिक अभावानं येणाऱ्या गोष्टी या ‘महाभारता’त काही पहिल्यांदाच आलेल्या नाहीत, हेही त्या सिद्ध करतात. आकाशात विहार करणाऱ्या राजवाड्याचा उल्लेख महाभारतात पहिल्यांदाच आलेला नाही. याअगोदर ऋग्वेदामध्ये सुस्न या राक्षसाच्या फिरत्या राजवाड्याचा उल्लेख सापडतो. स्वाती काळे यांचा हा व्यासंग ‘अद्भुत’ वर्गात मोडणारा!
स्वाती काळे म्हणतात, “महाभारतातील प्रत्येक घटना अगोदरच्या किंवा नंतरच्या घटनाक्रमांशी बांधली गेली आहे. त्यामुळे आपण महाभारतातील एखादंच पर्व वाचून निष्कर्ष काढू शकत नाही.” याची जाणीव ठेवत महाभारत आधी स्वत:मध्ये वैचारिकदृष्ट्या पूर्ण पचवून मगच त्यावरचे आपले निष्कर्ष त्यांनी दिले आहेत. म्हणूनच त्या ठामपणे म्हणतात, “शेवटी महाभारत हे एका सोंगटीचंच महाभारत आहे. या सोंगटीचं नियती असं नाव आहे,” तर व्यक्तीचा विचार करून त्या म्हणतात, “महाभारत हे एकाकी मातेचं करुणसुक्त आहे.” या ठिकाणी ‘कौंतेय’ या वि. वा. शिरवाडकर यांच्या नाट्यकृतीतील प्रसंगाची आठवण येते. त्यात कुंती आणि कर्ण यांच्यातील जन्मजात नातं सांगण्यासाठी दोघांच्याही पावलांची आणि पायाच्या बोटांची ठेवण सारखी होती, असा उल्लेख संवादातून येतो.
महाभारत ही एक सूडकथा आहे, अशी भूमिका आनंद साधले यांच्या ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ आणि दाजी पणशीकर यांच्या ‘महाभारत ः एक सुडाचा प्रवास’ या ग्रंथांमधून स्पष्टपणे समोर येतो. स्वाती काळे यांचाही निष्कर्ष हाच आहे. ‘एका स्त्रीला पायदळी तुडविल्यावर तिनं घेतलेल्या सुडाची करुण कहाणी म्हणजे महाभारत.’ या एका वाक्यातूनच त्यांनी अंबा आणि द्रौपदी यांच्या अपमानाचा त्यांनी उगवलेला सूड म्हणजे महाभारत असं विधान करतात. प्रचलित कथा-लोककथांमधून असा समज झालेला आहे की, अंबेनं भीष्माला लग्नाची गळ घातली. हा पिढ्यान्-पिढ्या मनात रुजलेला समज कसा बिनबुडाचा आहे, हे सांगताना त्या म्हणतात, “मूळ महाभारतात याचा उल्लेख आढळला नाही.”
‘महाभारत’ हा महाग्रंथ स्वाती काळे यांनी किती साक्षेपानं अभ्यासला आहे, याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक प्रकरणात येतो. त्यांच्या निष्कर्षांना जेव्हा त्या सबळ पुरावे देतात, कारणं देतात, दाखले देतात तेव्हा त्यांचं विधान हे वाचकांच्या मनात ठसतं. ‘शिखंडी’ तृतीयपंथी, अर्धनारी अर्धपुरुष होती असं विधान मूळ महाभारत वाचल्यावर करावंसं वाटत नाही.’ यामागचं आपलं विश्लेषण मांडताना त्या म्हणतात, “भीष्माला शिखंडीच्या जन्माचं रहस्य माहीत असल्यानं तो नेहमीच शिखंडीला स्त्री स्वरूपातील अंबा म्हणूनच पाहत आला.” हा निष्कर्ष अत्यंत मोलाचा आहे. मूळ संस्कृत ग्रंथ आणि लोककथांमधील/लोकमहाभारतातील त्या त्या प्रसंगाचं/व्यक्तींचं दर्शन आणि त्यातील तफावतही त्या सांगतात. ‘मूळ ग्रंथात दुःशासनाच्या रक्तानं तिचे केस माखण्याची शपथ तिच्या तोंडी नाही.’ याउलट ‘नल-दमयंतीच्या व पांडवांच्या कथेत द्यूताला मध्यवर्ती स्थान आहे आणि त्यात अनेक साम्यस्थळे आहेत’ असं साम्यस्थळ सांगताना त्या दमयंती वनवासात एकवस्त्रा होती व द्रौपदीही तिच्या शरीरधर्मामुळे द्यूताच्या दिवशी एकवस्त्रा होती ही महत्त्वाची माहितीही देतात. शिवाय ‘द्रौपदीच्या स्वयंवरात पाच पांडव उपस्थित होते.
दमयंतीच्या स्वयंवरातही पाच सारखे दिसणारे पुरुष उपस्थित होते… इंद्र, अग्नी, वरुण, यम हे नलाच्या वेषात…’ ५ पुरुषांचं हे साम्यस्थळ अद्भुत आहे. एकूण २० प्रकरणांमधून स्वाती काळे यांनी आपल्याला आकळलेला महाग्रंथ ‘महाभारत’ वाचकांना समजावून सांगितलेला आहे. त्यातून त्यांचा अन्वयार्थ लावण्याचा विवेक, निष्कर्षाप्रत येतानाचा व्यासंग याचं दर्शन तर होतंच. पण त्याचबरोबर त्यांची आस्वादक लेखनशैलीही जाणवते. ‘व्यासपर्व’मध्ये दुर्गा भागवतांची जशी संशोधक नजर आणि सौंदर्यदृष्टी दिसते तशीच नजर आणि दृष्टी स्वाती काळे यांच्या महाभारतावरील लेखांमधून प्रकर्षानं जाणवते. वाचकांच्या समजांना पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या संकल्पना, विचार यांना छेद देत त्यांनी आपलं संशोधन, विचार वाचकांपुढे नम्रपणे ठेवले आहेत. यातील काळे यांचे निष्कर्ष वाचकांच्या ज्ञानात भर टाकतात. त्यांना वैचारिकदृष्ट्या उन्नत करतात, हे या लेखनाचं मोठं यश आहे.