
कशी असणार ही नवी योजना?
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे (Chandani Chowk flyover) आज केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बस (Skywalk Buses) सुरु करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. यावर गडकरी म्हणाले, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की एकदा याचे प्रेझेंटेशन पहावे. या स्काय वॉक बसमधून एका वेळेस २५० प्रवासी प्रवास करू शकतात, असं आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिलं.
पुढे ते म्हणाले, आधीच वाहतूक कोंडी असल्याने आता पुण्यात वाहनांची संख्या वाढवू नका. कारण इथे खूप प्रदूषण झालंय, आपल्याला पेट्रोल डिझेलला देशातून हद्दपार करायचं आहे. त्यामुळे ४० टक्के प्रदूषण कमी होईल. व्हीआयपी कल्चर गेलं पाहिजे, सायरनचा कर्कश आवाज गेला पाहिजे. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. रिंग रोडही लवकरच पूर्ण होईल, मेट्रोचे कामही आता शेवटच्या टप्प्यात आहे, तर आपण स्कायवॉक बसची योजना आणणार असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
तीन पैकी दोन गोष्टी पूर्णत्वास गेल्याचा आनंद
गडकरी म्हणाले की, मंत्री झाल्यानंतर अनेकदा पुण्यात आलो. पुणेकरांकडून तीन मागण्या होत होत्या. पुणे मेट्रोचे काम पूर्ण करण्यात यावे. तसेच एअरपोर्टचा विकास करण्यात यावा आणि चांदणी चौक पुलाचे काम करण्यात यावे. यातील दोन गोष्टी पूर्ण झाल्यात, आता मेट्रोचे कामही पूर्ण होत आहे. यासाठी मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. पूल बांधण्यात अनेक अडचणी आल्या. एनडीएने १७ कोटी रुपये वसूल करुन घेतले. अनेक लोकांचे वाद होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पुलासाठी जमीन घेण्याचं काम केलं. त्यासाठी त्यांचेही आभार, असं गडकरी म्हणाले.