पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या सभागृहात येऊन मणिपूरमध्ये झालेल्या घटनांवर बोलावे यासाठी काँग्रेस पक्षाने दिलेला मोदी सरकारच्या विरोधातला अविश्वासाचा ठराव काँग्रेसवरच बूमरँग झाला. पंतप्रधानांनी अविश्वास ठरावावरील तीन दिवस झालेल्या चर्चेला उत्तर देताना देशातील जनतेनेच काँग्रेस पक्षावरच अविश्वास दाखवला आहे, असे बाणेदार उत्तर दिले होते. काँग्रेस पक्षाने केंद्रात ६७ वर्षे सत्ता उपभोगली. या काळात देशसेवेपेक्षा पक्षाच्या नेत्यांनी आपली घरे भरली. भ्रष्टाचार, घोटाळे, घराणेशाही, कंपूशाही, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण, देशाचे सरहद्दीवर संरक्षण करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष अशा कारणांने काँग्रेसची कारकीर्द गाजली. देशात मोदी पर्व सुरू झाल्यापासून काँग्रेसला ग्रहण लागले. सत्ता गेल्यापासून काँग्रेस पक्ष खूप अस्वस्थ आहे. केंद्रातून मोदींना हटविल्याशिवाय आपण सत्तेवर येऊ शकत नाही, याची गांधी परिवाराला खात्री आहे. म्हणूनच सन २०१८ मध्ये काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला होता आणि आता ऑगस्ट २०२३ मध्ये पुन्हा एकदा अविश्वासाचा ठराव आणला.
काहीही झाले तरी मोदी बधत नाहीत, त्यांचा अजेंडा ते बदलत नाहीत, इंडिया नावाखाली सर्व विरोधी पक्षांची मोट बांधली तरी मोदी सरकारवर काहीही परिणाम होत नाही हेच अविश्वास ठरावावर झालेल्या चर्चेच्या वेळी दिसून आले. इंडिया बॅनरखाली विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात कितीही मुठी आवळल्या तरी संसदेत आणि संसदेबाहेर काहीही फरक पडत नाही. तीन दिवस झालेल्या चर्चेला मोदींनी १३३ मिनिटे भाषण करून सडेतोड उत्तर दिले. देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा हा एक विक्रम असावा. विरोधी पक्षांकडे सर्व मिळून खासदारांची संख्या १४१ होती आणि एनडीएच्या खासदारांची संख्या तीनशे तीस होती. मग कितीही सरकारविरोधात ओरडा केला, कितीही घोषणा दिल्या, कितीही बेलगाम आरोप केले तरी सरकारकडे भरभक्कम बहुमत आहे, त्यापुढे अविश्वासाच्या ठरावाचे वांगे होणार हे सर्वश्रुत होते. मग काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला तरी कशाला ?
सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे राहुल गांधी खासदार म्हणून पुन्हा संसदेत आले. तीन महिन्यांनंतर आपला हिरो संसदेत आला म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांचे स्वागत केले. राहुल सरकारवर तोफा डागणार असे वातावरण निर्माण करण्यात आले. अविश्वासाच्या ठरावावरील चर्चेला राहुल गांधी सुरुवात करणार असे सर्व पक्षांनी गृहीत धरले होते. पण काँग्रेसने आघाडीचा फलंदाज म्हणून गौरव गोगई यांच्याकडे जबाबदारी सोपवली. म्हणे काँग्रेसची ही रणनीती होती. मग दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी मोठे आवेशपूर्ण भाषण केले. भारत जोडो यात्रेनंतर आणि गुजरातमधील न्यायालयांनी राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल बंदलले असतील.अनेकांना वाटले पण त्यांच्यातला बालीशपणा व थिल्लरपणा गेलेला नाही. अजूनही ते राजघराण्यातील युवराजाच्या भूमिकेतूनच वावरत असतात. ते मणिपूरला जाऊन आल्यामुळे तेथील परिस्थिती मोदींपेक्षा आपल्याला जास्त समजते अशा अाविर्भावात बोलत होते. मोदी सरकारशी तुलना त्यांनी ध्रुतराष्ट्र आणि रावणाशी केली. मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली, असे बेधडक आरोप केले. एवढेच नव्हे तर संसदेतील सत्ताधारी महिला खासदारांकडे बघून फ्लाईंग किस देण्यापर्यंत त्यांनी थिल्लरपणाचा कळस गाठला.
संसदेत खासदारांच्या बेशिस्त वर्तवणुकीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत, पण महिला खासदारांकडे बघून त्यांना फ्लाईंग किस देणे असे कधी घडले नव्हते. राहुल गांधी हे काँग्रेसचे बॉस आहेत. त्यांच्या मातोश्री ते भाषण करीत असताना सभागृहात उपस्थित होत्या, मग त्यांच्या साक्षीने त्यांनी असे आक्षेपार्ह वर्तन का करावे? भाजपच्या बावीस महिला खासदारांनी त्यांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे लेखी पत्र देऊन केली आहे. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी तर राहुल यांच्या फ्लाईंग किसवर अत्यंत कडक शब्दांत सभागृहातच संताप प्रकट केला. पंतप्रधानांनी आपल्या सव्वादोन तासांच्या भाषणात काँग्रेससह विरोधी पक्षांचे पूर्ण वस्त्रहरण केले. इंडिया नव्हे तर घमेंडखोर लोकांची ही विरोधी आघाडी असे त्यांना संबोधले. विरोधकांची आघाडी भारताला दिवाळखोरीकडे नेईल असा इशारा दिला.
देशातील महागाई, बेरोजगारी, दहशतवाद याला कारणीभूत असलेली आणि अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणारी आघाडी म्हणजे इंडिया आघाडी अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. भारत तेरे टुकडे होंगे अशा घोषणा देणाऱ्या फुटीरतावाद्यांना उत्तेजन देणारे भारत मातेची हत्या झाली असे सांगतात हे जास्त गंभीर आहे. राहुल गांधी यांची भाषा मोहब्बत की दुकान अशी आहे, प्रत्यक्षात ते लुट की दुकान आहे, असा ही पर्दाफाश पंतप्रधानांनी केला. पंतप्रधानांचे उत्तराचे भाषण चालू असताना विरोधी पक्ष सभात्याग करून बाहेर निघून गेले हे सर्वात आक्षेपार्ह होते. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणायचा, वाट्टेल तसे आरोप करायचे. पण पंतप्रधानांच्या उत्तराच्या भाषणाला सभागृहात हजर राहायचे नाही, हे संसदीय लोकशाहीत शोभते का? देशाचा नेता म्हणून काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत राहुल गांधी यांचे तेरा वेळा लाँचिंग केले पण प्रत्येक वेळा त्यात अपयश आले हा इतिहास आहे, त्याचीच पुनरावृत्ती अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी बघायला मिळाली. पंतप्रधान मोदींनी गेल्या ९ वर्षांत इशान्येकडील राज्यांना ४० वेळा भेट दिली आहे. रेल्वे, रस्ते, आदी विकासाच्या कामांना तेथे गती आली आहे. सारा देश तुमच्याबरोबर आहे, असे आश्वासन मोदींनी मणिपूरच्या जनतेला दिले आहे. केवळ राजकारणासाठी आणलेला अविश्वासाचा ठराव काँग्रेसवरच उलटला आहे.