
NCERT ने दिली मोठी जबाबदारी
मुंबई : इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या NCERT समितीमध्ये लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती (Sudha Murthy), गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांची केंद्र सरकारने नेमणूक केली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय (Bibek Debroy), सल्लागार समिती सदस्य संजीव सन्याल (Sanjeev Sanyal), आरएसएस विचारवंत चामू कृष्ण शास्री (Chamu Krishna Shastri) यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेचे (NIEPA) कुलपती महेश चंद्र पंत हे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या अंतर्गत १९ सदस्यीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य समिती (NSTC) चे अध्यक्ष असणार आहेत. NCERT ही समिती देशातील शालेय शिक्षणासाठी सिलॅबस आणि पाठ्यपुस्तक डेव्हलपर्ससाठी रोडमॅप तयार करेल. केंद्र सरकार साल २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके आणण्याची तयारी करीत आहेत. ही जबाबदारी सरकारने या समितीवर सोपविली आहे. इयत्ता ३री ते १२वी साठीच्या शालेय अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक सामग्री तयार करण्याची काम ही समिती करणार आहे.
कोण आहेत सुधा मूर्ती आणि शंकर महादेवन?
सुधा मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. टाटांच्या पहिल्या महिला अभियंता सुधा मूर्ती या सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. बकुला फॉल्स स्लोली, हाऊ आय टीट माय ग्रॅडमदर टू रीड आणि इतर कथा, महाश्वेता, डॉलर बहू आणि टीन थाउजंड स्टिचेस यासारख्या अनेक लोकप्रिय पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. मूर्ती या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यांचे प्रेरणादायी भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जगभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन भारतीय संगीत शिकवणाऱ्या शंकर महादेवन अकादमीचे संस्थापक, भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून शंकर महादेवन यांचे संगीत क्षेत्रात मोठे नाव आहे. शंकर महादेवन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. त्यांची अनेक गाणी सुप्रसिद्ध आहेत. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटात ते अभिनेता म्हणूनही दिसले होते. ‘ब्रेथलेस’ गाण्याच्या सादरीकरणासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक भाषांमधून गाणी गायली आहेत.