
अजितदादांनी नितीन गडकरींचे केले कौतुक तर विजय वडेट्टीवारांचे घेतले तोंडसुख
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी काल मंत्रालयाच्या वॉर रुममध्ये एक बैठक बोलावून पुण्यातील विकासकामांचा आढावा घेतला. यावर ही मुख्यमंत्र्यांची वॉर रुम असल्याने या रूमवरून कोल्ड वॉर सुरू झाला आहे, या सरकारची तीन दिशेला तीन तोंडं आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली. मात्र आज पुण्यातील चांदनी चौकातील नव्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनानिमित्त (Chandani Chowk flyover) आयोजित केलेल्या कार्यक्रमात अजितदादा पवार यांनी विरोधी पक्षनेत्यांना चांगलेच सुनावले.
अजितदादा म्हणाले, अजित पवारांनी मीटिंग घेतली तर तुझ्या काय पोटात दुखतंय? मी आणि देवेंद्रजी दोघेही त्या मीटिंगला होतो. देवेंद्रजी इंडस्ट्रीच्या तर मी रिसोर्सेस वाढवण्याच्या मीटिंग्ज घेत होतो. आम्ही बैठका घेतल्या तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच आहे. तरीदेखील हे म्हणतात, कोल्डवॉर झालं. यांना उद्योग नाहीत, आता कुठे विरोधी पक्षनेते झाले आहेत. कुठे यांना कुठलं कोल्डवॉर दिसलं काय माहित!, अशा शब्दांत अजितदादांनी वडेट्टीवारांना फटकारले.
आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नसल्याने तेही नाराज असल्याच्या उलटसुलट चर्चा माध्यमांतून होत होत्या. यावरही अजितदादांनी स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकले नाहीत. प्रत्येकाला आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. आता साथीचे आजारही बळावले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना दोन दिवस गावी विश्रांती घेण्यास सांगितले आहे, असे अजितदादा म्हणाले.
आम्ही काय बेअक्कल आहे का?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, असं विरोधकांना वाटतं. पण आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एकच असताना दोघांचा डोळा तिथे ठेवून कसं काय चालेल? आणि त्यात ती खुर्ची भरलेली आहे. मला हा विषय काढायचा नव्हता पण आम्ही बोललो नाही तर लोकांना एकच बाजू दिसते. आम्ही कामाला वाहून घेणारी माणसं आहोत, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.
पुणेकरांची मेट्रोची अडचण दूर करा
आज चांदणी चौकाच्या उद्घाटनासाठी अजित पवार मेट्रोने पुण्याला दाखल झाले. यावेळेस त्यांनी प्रवासात पुणेकरांना त्यांच्या समस्या विचारल्या. तेव्हा पुणेकरांनी मेट्रो सहा वाजल्यापासून सुरु करण्याची मागणी केली. त्यावर आजच्या भाषणात 'पुणेकरांची मेट्रोची अडचण दूर करा' असं म्हणत अजितदादांनी ही मागणी मान्य केली.
नितीन गडकरींचे केले कौतुक
अजित पवार म्हणाले मी पालकमंत्री असताना अनेक न्यायालयीन अडथळे आले. मात्र हे सर्व अडथळे पार पाडले. अनेक बैठका घेतल्या. जुना पूल पाडण्याचे यशस्वी नियोजन केले. त्यासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जबाबदारी घेतली. सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. नितीन गडकरी यांनी पैशाची कमी पडू दिली नाही. दिलदारपणे त्यांनी अडचणी सोडवल्या. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला, नेता असावा तर नितीन गडकरींसारखा, असे अजित पवार म्हणाले.