
मंत्र्यांमध्ये अंतर्गत चढाओढ पण मुख्यमंत्र्यांनी दिला तिसरा पर्याय
मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्तारावरुन आणि पालकमंत्रीपदावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चांगलेच मान-अपमान नाट्य रंगले आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्य दिनी (Independence Day) ध्वजारोहणानिमित्ताने कोणत्या जिल्ह्यात कोणाला संधी मिळणार, कोणाचे पारडे जड राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यात विशेषतः रायगड, पुणे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होत्या.
मात्र संभाव्य वाद आणि दावे टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तिसरा पर्याय निवडण्यात आल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे.
रायगडमध्येही मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास भरत गोगावले यांनी उघडपणे तीव्र विरोध केला आहे. या संघर्षावर शक्कल लढवत रायगडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आहे. तर तटकरे यांना पालघरमध्ये ध्वजारोहण करण्यास सांगण्यात आले आहे.
पुण्यात यावेळी अजितदादा की चंद्रकांतदादा नेमके कोणते दादा ध्वजारोहण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अखेर पुण्यात ध्वजारोहण करण्याचा मान पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनाच देण्यात आला आहे. तर पुण्यासाठी उत्सुक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर पालकमंत्री म्हणून स्पर्धेत असलेल्या हसन मुश्रीफ यांना सोलापूरमध्ये ध्वजारोहण करण्यास सांगण्यात आले आहे.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आहेत. तर जेष्ठ मंत्री छगन भुजबळ हेही नाशिकचेच आहेत. मात्र या दोघांमधील संघर्ष टाळण्यासाठी दोघांनाही डावलत नाशिकमधील ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
छगन भुजबळ यांना अमरावतीमध्ये तर दादा भुसे यांना धुळ्यात ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जळगावमध्ये सध्या गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि अनिल पाटील असे तीन मंत्री आहेत. मात्र जळगावमध्ये गुलाबराव पाटीलच ध्वजारोहण करणार आहेत. अनिल पाटील यांच्याकडे बुलढाणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.