प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी शासनाची कठोर पावले
मुंबई : पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकार (State Government) जागृत झाले असून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. त्यातच मुंबईत पावसामुळे तुंबण्याचे प्रकार वाढल्याने राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गटारांमध्ये, नदीनाल्यांमध्ये तुंबणारे हे पाणी प्लास्टिकच्या कचर्यामुळे (Plastic Waste) होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने प्लास्टिक पिशव्या वापरणार्यांना ५००० रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्या दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवरही कारवाई केली जाईल. १५ ऑगस्टनंतर प्लास्टिकचा वापर आढळल्यास ही कारवाई केली जाणार आहे.
याआधीही अनेकदा प्लास्टिक न वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली आहे. मात्र तितकी कठोर पावले उचलली गेली नाहीत. यावेळेस मात्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्यांना रोखण्यासाठी पालिकेचे तीन अधिकारी, एक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे.
कोणत्या प्लास्टिक गोष्टींवर असणार बंदी?
प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) , फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, कँडी स्टिक, थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड ,सिगरेटचं पॅकेट, १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी), अशा प्लास्टिक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
का घेण्यात आला हा निर्णय?
प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. प्लास्टिक कचरा नाले, गटारांमध्ये अडकून राहिल्याने पूर परिस्थती निर्माण होते. त्यामुळे प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय आहे. यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. कचरा डेपो, समुद्रामध्ये हा कचरा फेकला जातो. याची पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra