सरकारच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेसोबत
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचे निलंबन
नवी दिल्ली : विरोधी पक्षाने लोकसभेत आणलेल्या अविश्वास ठरावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देताना आपल्या सव्वादोन तासांच्या भाषणात काँग्रेसने सत्तेवर असताना देशाला कसे अधोगतीकडे नेले व ‘एनडीए’ सरकारने ९ वर्षांत कसे समृद्धीच्या मार्गावर तारले, हे तपशीलवार सांगितले. देशाची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था, उत्तरेतील आठ राज्यांचा कालबद्ध विकास आराखडा सांगताना मणिपूरमधील अशांततेला काँग्रेसच जबाबदार असल्याचे ठणकावून सांगितले. मणिपूरमध्ये लवकरच शांततेचा सूर्य उगवेल व मणिपूरच्या रहिवाशांसोबत संपूर्ण देश आहे, असा दिलासा दिला. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी दाखल केलेला मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव लोकसभेत गुरुवारी आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासांहून अधिक वेळ भाषण करत जोरदार उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांसह काँग्रेस पक्षाचा खरपूस समाचार घेतला. तसेच मणिपूरमधील हिंसाचारावर देखील मत व्यक्त केले.
मोदींनी मणिपूरमधील जनतेला हे आश्वासन दिले की, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे आणि लवकरच तेथील परिस्थिती सामान्य होईल. मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांची नवी आघाडी ‘INDIA’वर देखील जोरदार हल्ला चढवला. जेव्हा, जेव्हा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतात, तेव्हा तेव्हा एनडीए आणि भाजपसाठी ते शुभ ठरते. काँग्रेस पक्षाकडे स्वत:चे असे काहीच नाही. त्यांनी पक्ष, नाव, चिन्ह सर्व काही चोरले आहे, अशी टीका मोदींनी यावेळी केली.
मोदींच्या भाषणानंतर अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदान झाले आणि हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला, जो सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. चौधरी यांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान करताना पंतप्रधान मोदींची तुलना नीरव मोदीशी केली होती. तसेच मोदींचे भाषण सुरू असताना देखील ते अधून मधून बोलण्याचा प्रयत्न करत होते. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी असा ठराव मांडला की, ‘या सभागृहाने अधीर रंजन चौधरी यांनी जाणीवपूर्वक आणि वारंवार केलेल्या गैरवर्तन करून सभागृहाची अवहेलना केली. अध्यक्षांच्या अधिकाराने त्यांच्या गैरवर्तनाचे प्रकरण समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. सभागृहाची विशेषाधिकार समिती आणि समिती अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन चौधरी यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यात यावे.
काँग्रेसवर लोकांना ‘नो कॉन्फिडन्स’…
- काँग्रेसची नीती चांगली नाही, त्यांची नियतही चांगली नाही, देशाच्या जनतेने काँग्रेसवर नो कॉन्फिडन्स दाखवला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातल्या अनेक राज्यांत काँग्रेसला जनतेने नाकारले असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसकडे स्वतःचे असे काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढेच काय तर मतांसाठी काँग्रेसने गांधी नावही चोरल्याची टीका पंतप्रधानांनी केली. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर आणि काँग्रेसवर टीका केली.
- विरोधकांना देवाने सुबुद्धी दिली आणि अविश्वास प्रस्ताव आणला, त्यांचा अविश्वास प्रस्ताव म्हणजे आमच्यासाठी शुभ संकेत. त्यामुळे २०२४ साली आम्ही विक्रमी जागांसह पुन्हा सत्तेत येणार, असा ठाम विश्वास मोदींनी व्यक्त केला. विरोधकांनी पहिल्यापासून जर गांभीर्याने कामकाजात भाग घेतला असता, तर अनेक विधेयकं सहमत होऊ शकली असती, असे मोदी म्हणाले. विरोधकांनी फिल्डिंग आमच्यासाठी सजवली, पण चौके आणि छक्के आमच्याकडून लागले. तिकडून फक्त नो बॉल पडत राहिले. ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडलेत ते आमच्याकडून हिशोब मागत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
- काँग्रेसकडे ना नीती आहे, ना नियत आहे, इतकी वर्षे सत्ता भोगूनही काँग्रेस अनुभवशून्य आहे. माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातल्या सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांच्या यादीत असेल. गेल्या तीन दिवसांपासून विरोधकांनी माझ्याविरोधात जेवढे काही अपशब्द वापरायचे तेवढे वापरले. पण ते त्यांच्यासाठी चांगले आहे, कारण त्यांचे मन काहीसे हलके झाले असेल, असे मोदी म्हणाले.
- विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही गुप्त वरदान मिळाले आहे, ते लोक ज्यांचे वाईट इच्छितात त्यांचे चांगलेच होत आहे. गेल्या नऊ वर्षांत माझ्याविरोधात अनेक गोष्टी केल्या, पण माझे चांगलेच झाले. देशातील बँकिंग सेक्टर नष्ट होईल, परदेशातून काही लोकांना आणून हे सांगितले जात होते. पण आमची सार्वजनिक बँक चांगले काम करत आहे. एलआयसीच्या संदर्भात विरोधकांनी संभ्रम तयार केला, मात्र आता एलआयसी कुठच्या कुठे पोहोचलीय, यशस्वी होतंय. विरोधकांनी जी संस्था संपेल असे सागतेय ती संस्था मजबूत होते, असे त्यांनी सांगितले.