
राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील २५ फुटांच्या प्रतिकृतीला मंजुरी
मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट उंचीच्या पुतळ्यासाठी गाझियाबाद येथील राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील २५ फुटांच्या प्रतिकृतीला राज्य सरकारने गुरुवारी अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रतिकृतीच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा भव्य पुतळा साकारला जाणार आहे.
- इंदू मिल येथील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ नोव्हेंबर २०२२ रोजी बैठक झाली होती.
- या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व्यक्तींना सोबत घेऊन गाझियाबाद येथील राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील २५ फुटांच्या प्रतिकृतीची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- त्यानुसार ६ एप्रिल २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत राम सुतार यांच्या शिल्पशाळेला भेट देऊन तेथील २५ फुटांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्याची पाहणी करण्यात आली.
- या पाहणीदरम्यान मान्यवरांकडून २५ फुटी पुतळ्याच्या प्रतिकृतीला सहमती देण्यात आली होती. या प्रतिकृतीच्या धर्तीवर इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने अंतिम मंजुरी दिली. यासंदर्भात राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय जारी केला.