
तमीम इक्बालने बांग्लादेश एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याच्या एका आठवड्यानंतर शुक्रवारी शाकिब अल हसनच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी याची अधिकृत घोषणा केली. आगामी आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेकरिता शाकिब बांगलादेशच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपकरिता बांगलादेशच्या संघाची घोषणा उद्या शनिवारी करण्यात येणार आहे. एकूण १७ खेळाडूंची निवड केली जाणार आहे. त्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नव्या कर्णधाराची घोषणा केली.
शाकिब हा बांगलादेशचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने ५२ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. शाकिब हसन यांनी वर्ष २००९ ते २०१७ दरम्यान नेतृत्व सांभाळले आहे. त्यांच्या नेतृत्वात संघाने २३ वेळा विजय मिळवला आहे. तर २६ वेळा संघाला अपयश आले आहे.