आपल्या आगळ्या दाखल्यांतून ज्ञानदेव ‘आत्मज्ञाना’ची सूक्ष्मता, अनंतता, संजीवकता, उत्कृष्टता ताकदीने रेखाटतात! तो अर्थ समजून घेताना म्हणून श्रोत्यांच्या, वाचकांच्या बुद्धीचा आवाका वाढतो, धार तीक्ष्ण होते. ज्ञानदेवांच्या या दिव्य ‘दृष्टी’ने वाचकांना आत्म व सृष्टी समजू लागते.
‘जे ज्ञान देणारे ते ‘ज्ञानदेव’! ते ज्ञान देताना त्यांच्या प्रतिभेची उंची नि खोली काय बोलावी? महामुनी व्यासांच्या कुशाग्र बुद्धीतून भगवद्गीता साकारली! ती गीता मराठीत आणताना, ‘ज्ञानदेवां’ची प्रतिभा बहरली! त्यांना प्रतिमा स्फुरली! याचा अनुभव ‘ज्ञानेश्वरी’त पानोपानी येतो. अठराव्या अध्यायात तर याचा कळस होतो.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अलौकिक ज्ञान अर्थात ‘आत्मज्ञान’ दिलं. त्याचं वर्णन श्रीकृष्णांच्या मुखातून ज्ञानदेवांनी किती बहारदार केलं आहे!
श्रीकृष्ण म्हणतात, अरे ते हे आत्मज्ञान, सर्वांना गूढ असणारा जो मी, त्या माझेही गुप्त धन होय; परंतु तुझ्यापासून ते गुप्त कसे ठेववेल?
ती ओवी अशी –
हें गा आत्मज्ञान।
मज गोप्याचेंही गुप्त धन।
परी तूं म्हणूनि आन।
केविं करू?॥ ओवी क्र. १३२६
पुढे येतं – ‘ह्याकरिता हे पांडवा, तुझ्यावर संतुष्ट होऊन तुझ्याविषयीच्या कळकळीने आम्ही हा गुप्त ठेवा तुला दिला..’ ओवी क्र. १३२७
ज्ञानदेवांनी या संवादात किती जिव्हाळा भरला आहे! त्यातून श्रीकृष्णाचं अर्जुनावर असलेलं अतूट प्रेम जाणवतं. त्याचबरोबर या ज्ञानाचं महत्त्वही कळतं की ते निवडक, सोलीव आहे; परंतु ज्ञानदेवांची प्रतिभा इथे थांबत नाही. हे ज्ञान कसं निवडक आहे याच्या सरस प्रतिमा ते साकारतात. त्याचे दाखले देतात.आकाश सर्वांहून सूक्ष्म असूनही ते जसे गाळून घ्यावे, अमृत आतबाहेर गोड असूनही त्याची साल काढावी, अथवा दिव्याकडून जसे दिव्य करवावे.
येथ आकाश आणि गाळिजे।
अमृताही साली फेडिले।
कां दिव्याकरवीं करविजे।
दिव्य जैसें॥ ओवी क्र. १३२९
यात आकाश हे तत्त्व आलं आहे. ते अनंत व सूक्ष्म! त्याला गाळणं, त्यातून निवडक घेणं ही कल्पना किती अफाट आहे!
पुढचा दाखला आहे जशी अमृताची साल काढावी ही कल्पना उत्कृष्टतेची परिसीमा दाखवणारी! आपण फळाची साल काढतो तेव्हा त्यातील गर, गाभा मिळतो. त्यात अधिक गोडवा असतो. आता अमृत मुळातच गोड! त्याची साल काढली की ‘गोडी’चा गाभा सापडणार. तसं हे ज्ञान आहे. अमृताप्रमाणे, आतल्या गाभ्याप्रमाणे ‘संजीवक’! पुढे आहे ‘दिव्याकडून दिव्य करवावे’ दिव्य शब्दाचा इथे अर्थ ‘प्रतिज्ञा’ होय. प्रतिज्ञेने प्रतिज्ञा घ्यावी… मुळात प्रतिज्ञा घेणं म्हणजे पक्का निश्चय, दृढ निर्धार होय. अशा प्रतिज्ञेनं प्रतिज्ञा घ्यावी म्हणजे निश्चयाचे, दृढतेचे अंतिम टोक होय. या ज्ञानात जणू निर्धाराचा कळस आहे. पुढे याहून सूक्ष्म दाखला ज्ञानदेव ज्ञानासाठी देतात. ज्या सूर्याच्या अंगप्रकाशाने पाताळातील परमाणूही दिसतो, त्या सूर्याच्या डोळ्यांत अंजन घालावे. ती ओवी पुढीलप्रमाणे –
‘जयाचेनि अंगप्रकाशें।
पाताळींचा परमाणु दिसे।
तया सूर्याहि कां जैसें।
अंजन सूदलें॥ ओवी क्र. १३३०
पुढे येतं – तसे मी सर्वत्र असून व सर्वांचा विचार करून जे माझे खात्रीस उत्तम, ते हे ज्ञान धनंजया, तुला सांगितले…
आपण डोळ्यांनी पाहतो, पण अंजन घातल्यावर डोळ्यांत तेज येतं. आपण अधिक सूक्ष्म गोष्टी बघू शकतो. हा रोजच्या जीवनातील प्रसंग आहे. पण ज्ञानदेवांच्या दिव्य दृष्टीला काय दिसलं? सूक्ष्म परमाणू पाहू शकणाऱ्या सूर्याच्या डोळ्यांतील अंजन! त्याप्रमाणे या ज्ञानाच्या ठिकाणी तेज आहे.
आकाश, अमृत आणि सूर्य या आगळ्या दाखल्यांतून ते या ‘आत्मज्ञाना’ची सूक्ष्मता, अनंतता, संजीवकता, उत्कृष्टता किती ताकदीने रेखाटतात! तो अर्थ समजून घेताना म्हणून श्रोत्यांच्या, वाचकांच्या बुद्धीचा आवाका वाढतो, धार तीक्ष्ण होते. नव्या दृष्टीने आत्म व सृष्टी समजू लागते.
(manisharaorane196@gmail.com)
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…