
- समर्थ कृपा : विलास खानोलकर
एका पंढरपूरच्या कुष्ठरोग्याला पंढरीनाथांनी स्वप्नात सांगितले, ‘अक्कलकोटास जा. म्हणजे आरोग्य प्राप्त होईल.’ दोन दिवस हाच दृष्टांत झाल्यामुळे तो अक्कलकोटास आला. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन सेवेकरिता तेथेच राहिला. श्री स्वामी समर्थांचे त्रिकालदर्शन, तीर्थप्रसाद, मुखाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण अशी त्याची सेवा सुरू होती.
एके दिवशी एक ब्राह्मण श्री स्वामी समर्थाच्या दर्शनास आला. त्यांचे दर्शन घेऊन तो हात जोडून उभा राहिला. तो महाराज त्यास म्हणाले, ‘अहो, भटजीबुवा तुमच्या परसात जुने चंदनाचे झाड आहे. त्याचे एक खोड आम्हास आणून द्या.’ श्री स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या ब्राह्मणाने चंदनाचे खोड श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण केले. ते खोड त्या कुष्ठपीडितास देऊन श्री स्वामी म्हणाले, ‘उगाळून अंगास लावावे, चंदनाचे खोड ज्यादिवशी सरेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग जाईल.’ श्री स्वामींच्या आज्ञेनुसार ते खोड उगाळून तो अंगास लावू लागला. तीन वर्षे ज्या दिवशी पूर्ण झाली, त्याच दिवशी चंदनाचे खोड सरले आणि त्याचा कुष्ठरोगही बरा झाला. संदर्भ विशेष - लीलाकथेत श्री स्वामी समर्थांनीच पंढरीनाथाच्या दोन दिवसांच्या दृष्टांताच्या निमित्ताने अक्कलकोटात आणले. त्याच्या सेवेबद्दल या लीलेत उल्लेख आहे. ‘सेवा केली, तरच मेवा’ या वचनानुसार श्री स्वामींनी एका ब्राह्मण भटजीकडून चंदनाचे खोड मागविले. ते त्या कुष्ठरोगावर उगाळून लावण्यास सांगितले. श्री स्वामी निर्देशित चंदनाचे खोड उगाळून-उगाळून संपले आणि पंढरीनाथही कुष्ठरोगमुक्त झाल. ते चंदनाचे झाड कुठे आहे, हे श्री स्वामी अगदी सहज सांगतात, ही त्यांच्या सर्वसाक्षीत्व सामर्थ्याचा बोध करून देणारी घटना. भटजीकडे चंदन एका शूद्र कुष्ठरोग्यास देणे, यामागे श्री स्वामींचा काय बरं असेल? त्यांना इतर ठिकाणहून चंदनाचे खोड नसते का मिळाले? पण त्यांचा उद्देशच मुळी फार व्यापक होता. ब्राह्मणाच्या परसातील चंदनाचे खोड. त्याचा वापर पंढरीनाथासारख्या एक सर्वसामान्यास, त्याचाही बोध आपण करून घेतला पाहिजे. चंदन हे स्वतः झिजून इतरांना सुगंधित करते. परोपकाराचे प्रतीक म्हणून चंदनाचा उल्लेख केला जातो. चंदनाचे लेपन म्हणजे निरपेक्ष आणि व्रतस्थ वृत्तीने परोपकार करीत राहणे. आसक्तीचा कुष्ठरोग जडलेल्या आपल्यासारख्यांनी थोडे तरी इतरांसाठी झिजायला नको का? थोडाफार परोपकार करायला नको का? परोपकारी कृत्ये कुष्ठरोग बरा होईल, हा या कथेचा अर्थबोध आहे. थोडक्यात स्वामी चंदन, भक्तही चंदन!
समर्थ सुगंधी चंदन, भक्त करी वंदन
गरीब कुष्ठरोगी राही पंढरपुरी भिक्ष्या मागण्या जाई दारोदारी ॥ १॥ दिनरात तो सेवा करी न जाई स्वतःच्याही घरी॥ २॥ बिलकुल अंगात नव्हते त्राण वाट पाही केव्हा जाईल प्राण ॥ ३॥ पंढरपूर देव देवताची खाण कुष्ठरोग्याच्या दुःखाची नव्हती जाण॥ ४॥ फक्त विठुराया जाणीले त्रास देखुनी रोग्याचे शरीर मास ॥ ५॥ भक्ताचा विठुरायांनीही घेतला ध्यास स्वामींच बरे करतील खास ॥ ६॥ विठोबा आले स्वप्नी त्वरी स्वामी अक्कलकोटी करतील बरी॥ ७॥ बिलकुल अंगात नव्हते त्राण वाट पाही केव्हा जाईल प्राण ॥ ८॥ चालत चालत होता घेऊनी काठी मनाने धावत पोहोचला अक्कलकोटी॥ ९॥ भक्त पाहूनी अक्कलकोटची जत्रा बरे होण्याची कळली मात्रा ॥ १०॥ गरीब आला स्वामीदारी कसा बसा पोहोचला दरबारी ॥ ११॥ पसरूनी हात, दया जरा करी आयुष्यभर करीन चाकरी॥ १२॥ मज आले कुष्ठरोग करी बरी शरण शरण आलो दारी॥ १३॥ नाही केले काही पाप तरी झाला हा ताप ॥ १४॥ बरे करा तुम्हीच मायबाप मी गरीब भरडलो अश्राप॥ १५॥ गडबडा लोळे स्वामीचरणी माहीत नाही कोणी केली करणी ॥ १६॥ की असे हे गत जन्मीचे पाप ह्या जन्मी तरी मी निष्पाप ॥ १७॥ असता विठोबा, दत्तगुरू, स्वामी कधी पडणार नाही कमी॥ १८॥ तुम्हीच आमचे मायबाप दूर करा हा कुष्ठरोग ताप॥ १९॥ तेवढ्यात दरबारी आला ब्राह्मण स्वामी वदे, आज्ञे, ऐकतो ब्राह्मण॥ २०॥ परसदारात तुझ्या सुंगधी चंदन घेऊनी ये तुकडा करूनी वंदन ॥ २१॥ ब्राह्मणे धावत जाई बागेत घेऊनी चंदन आला लगबगीत॥ २२॥ सोवळ्यातले सुंगधी चंदन स्वामी चरण परीपूर्ण चंदन॥ २३॥ करूनी स्वामींना वंदन स्वीकार करा तुम्ही रघुनंदन॥ २४॥ पसरे दरबारी सुगंधी चंदन शिरसाष्टांग नमस्कार भक्त वंदन॥२५॥ स्वामी वदले प्रेमाने कुष्ठरोगी आज पासूनी संपले भोगभोगी॥ २६॥ चंदनलेप, लाव तुझ्या अंगी संपेल जेव्हा, तेजस्वी होईल अंगी॥२७॥ चंदन घेऊनी तुष्ट झाला कुष्ठरोगी चंदन झरवूनी रोज लावी अंगी॥ २८॥ दिनरात स्वामी नामात दंगी स्वामीदर्शन, परीपूर्ण अंगी॥ २९॥ शांत शीतल सुगंधी चंदन तीर्थप्रसाद स्वामी वंदन ॥ ३०॥ बरा झाला कुष्ठरोगी झाला परीपूर्ण निरोगी॥ ३१॥ वर्षभरात चंदन संपले भोग त्यांचेही आनंदे संपले ॥ ३२॥ स्वामीपूजा स्वामीनाम पुण्यजमा तमाम काम ॥ ३३॥ आयुष्यभर राहिला सेवेत स्वामी काही कमी पडू दिले नाही स्वामी॥ ३४॥ स्वामी समर्थ दर्शन जादू स्वामी नामात भरली जादू॥ ३५॥ भिऊ नको तुझ्या पाठीशी स्वामी सदा उभे पाठीशी॥ ३६॥ हम गया नही है जिंदा आज उद्या रोज यंदा॥ ३७॥ हम किसीका नही बंधा स्वामी दर्शन रुपया बंदा ॥ ३८॥ स्वमींनीच घडवले जग संपूर्ण स्वामी समर्थ चालीसा पूर्ण ॥ ३९॥ स्वामी चंदन, भक्त चंदन दरबार चंदन, अक्कलकोट ॥ ४०॥ स्वामी नाम चंदन स्वामी नेत्र शीतल चंदन ॥ ४१॥ वटवृक्ष स्वामी स्पर्शे चंदन स्वामी खडावा सुगंधी चंदन ॥ ४२॥ स्वामी गंध चंदन स्वामी उदी चंदन ॥ ४३॥ स्वामी तीर्थ चंदन स्वामी प्रसाद चंदन ॥ ४४॥ हातही चंदन, पायही चंदन गायही चंदन, वासरू चंदन ॥ ४५॥ अंतरी निर्मल, बाहेर निर्मल परिसर निर्मल, बगीचा निर्मल ॥ ४६॥ विहीर तळी निर्मल गंगा जल निर्मल ॥ ४७॥ काळे आकाश करी निर्मल मनातील मळमळ करी निर्मल ॥ ४८॥ स्वामी निर्मल चंदन स्वामी चंदन भक्त चंदन ॥ ४९॥ दिनरात स्वामींना करतो वंदन मातापिता, गुरू, बहीण वंदन ॥ ५०॥ निष्काम, निस्वार्थ, काम वंदन स्वामी स्पर्श चंदन नंदनवन ॥ ५१॥ स्वामी आशीर्वाद दे आयुष्य संपूर्ण भक्त विलासकृत स्वामी बावन्नी पूर्ण॥ ५२॥vilaskhanolkardo@gmail.com