
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेतही 'फ्लाईंग किस' देणारे महाशय
राहुल गांधींच्या संसदेतील गलिच्छ कृत्यावर नितेश राणे यांनी व्यक्त केला संताप
मुंबई : लोकसभेत (Loksabha) विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर (No confiedence Motion) चर्चेदरम्यान नुकतीच खासदारकी परत मिळालेल्या राहुल गांधींनी (Rahul Gandhi) संसदेत गलिच्छ कृत्य केले. त्यांनी संसदेत 'फ्लाईंग किस' (Flying kiss) दिल्याचा आरोप भाजपच्या नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे. या कृत्याचा सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. मात्र विरोधी पक्ष याला पाठिंबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गट व काँग्रेसच्या नेत्यांवरील आपला संताप व्यक्त केला.
नितेश राणे म्हणाले, काल संसदेत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचं ऐतिहासिक भाषण झालं. अविश्वास प्रस्ताव विरोधकांना आणण्याचा अधिकार का नाही आहे हे मुद्देसूदपणे त्यांनी त्यात सांगितलं. त्या भाषणाच्या मिरच्या प्रत्येक विरोधी पक्षाच्या सदस्याला निश्चितपणे झोंबल्या. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवले. पण त्यानंतर भाषण म्हणावं की कॉमेडी असं राहुल गांधींचं भाषण झालं. 'भारत जोडो' यात्रेमध्ये हे महाशय 'फ्लाईंग किस' देत सगळीकडे फिरत होते. तसेच एका महिला खासदाराला संसदेत अशी 'फ्लाईंग किस' देणं किती योग्य आहे, हे ठाकरे गटाच्या सर्व महिला खासदार, संजय राऊत राहुल गांधींनी कसं जग जिंकलं आहे, अशा प्रकारे सांगून त्यांची पाठराखण करत आहेत, लाचारी करत आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला.
संजय राजाराम राऊत हा फ्लाईंग किस देतच महाराष्ट्रामध्ये फिरतो. आता याला संजय राजाराम राऊत म्हणायचं की महाराष्ट्राच्या राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. ज्याला संसदेत महिला खासदाराला फ्लाईंग किस देणं योग्य वाटतं, त्याचे डॉक्टर महिला असो किंवा न्यूझीलंड हाऊसचं प्रकरण असो असे काही व्हिडीओज आमच्याकडे आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी राऊतांचं हे प्रकरण पुन्हा वर काढलं.
... त्यामुळे कालचं घाणेरडं प्रदर्शन आवडणारच
नितेश राणे म्हणाले, संजय राऊतच्या मालकाच्या मुलाचे नाईटलाईटच्या नावाने जे काही कार्यक्रम सुरु असतात त्याच्यामुळे त्याला राहुल गांधींचं कालचं घाणेरडं प्रदर्शन आवडणारच. संजय राऊत आणि त्याच्या मालकाचा मुलगा कायम जादूच्या झप्प्याच देत बसतात आणि महिला चिडल्या की मग त्यांना फोनवर शिव्या देत बसतात, अश्लील भाषा करतात, त्यांना मारुन टाकतात. त्यामुळे हे लोक जे करतात त्याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. पण आमच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या आज याविरोधी मुंबईत आंदोलन करत आहेत. राहुल गांधींच्या कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.
'त्या' महिलांचीही नावं घ्या
नितेश राणे म्हणाले, मी एक फार मोठा विनोद ऐकला. ठाकरे गटाचे आमदार राज्यातील महिला अत्याचारांविरोधात आज राज्यपालांना भेटणार आहेत. राज्यपालांना ते जे निवेदन देणार आहेत त्यात ते डॉक्टर पाटकरचा उल्लेख करणार आहेत का? दिशा सालियनचा उल्लेख करणार आहेत का? या महिलांची नावं असलेली यादी राज्यपालांना द्यायची हिंमत करा.
पत्रकारांच्या हल्ल्यावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही
संजय राऊतांनी सकाळी आमचे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारावर हल्ला केला असा आरोप केला. पत्रकारांवर हल्ल्याचं समर्थन करुच नये मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या आमदारावर संजय राऊतला अशा प्रकारे टीका करण्याचा आधिकार आहे का? कारण महाविकास आघआडीच्या काळात किती पत्रकारांवर हल्ले झाले! उद्धव ठाकरे आणि मविआवर जाहीर टीका केल्यामुळे अर्णव गोस्वामी या ज्येष्ठ पत्रकाराला पहाटे त्याच्या घरातून अटक केली गेली. राहुल कुलकर्णी, राहुल झोरी अशी मी यादी देऊ शकतो, ज्या पत्रकारांवर मविआच्या काळात केसेस टाकून फसवलं गेलं. म्हणून पत्रकारांच्या हल्ल्यावर बोलण्याचा संजय राऊतला नैतिक अधिकार नाही, असे नितेश राणे यांनी खडसावले.