Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

Opposition Parties : पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक; ते स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत!

Opposition Parties : पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक; ते स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : लोकसभेत (Loksabha) अविश्वास ठरावावर (No confiedence Motion) चर्चेला सुरुवात झाल्यापासून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे. आज या चर्चेचा शेवटचा दिवस असून आज मतदान होऊन निकाल लागणार आहे. दरम्यान, मोदी सरकारकडे (Modi Government) संपूर्ण बहुमत असल्याने प्रस्ताव फेटाळला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टोला लगावला आहे. विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. आज सकाळीच एका ट्विटद्वारे त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.


देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.


पुढे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.





भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही, असं ट्वित करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची चांगलीच जिरवली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment