
मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला आढावा
मुंबई : मुंबई (Mumbai News) शहरातील १४,००० शौचालयांची बांधकामे तातडीने करावीत, प्रतिदिन ५ वेळा शौचालय स्वच्छता करणे, मुंबई महापालिकेच्या (My BMC) सर्व उद्यानांमध्ये विविध सुधारणांसह सुरक्षा रक्षकांची दर्जोन्नती व मनोरंजनात्मक सुधारणा तसेच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर भेडसावणाऱ्या सार्वजनिक पार्किंग समस्येबाबत योग्य त्या परिणामकारक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिले.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेच्या “नागरिक कक्ष” कार्यालयात महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासु, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या समवेत मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांबाबत बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.
या बैठकीत मुंबईच्या विविध विभागातील रस्ता, गटारे, कचरा व्यवस्थापन, पदपथ इ. समस्यांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. तसेच महापालिका शाळांचे नुतनीकरण आणि पूर्णत: वापर सुरू करणे, निवृत्तीनंतर महापालिका कर्मचाऱ्यांचे ६० दिवसांत निवृत्ती वेतन मिळवून देणे, उद्यान सुधारणा, सार्वजनिक मनोरंजन ठिकाणे सुधारणा, महानगरपालिका रुग्णालय सुधारणा, आपला दवाखाना बद्दलच्या तक्रारी आणि सूचना, सार्वजनिक पार्किंग आणि इतर पार्किंग समस्या, महापालिका शाळांचे नूतनीकरण करण्याबरोबर त्यामध्ये कौशल्य विकास, अभ्यासिका व पाळणाघर या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.