अकोला येथील सभा आटोपली. पुढे टिळकांना अटक झाली. राजसत्तेच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. बडी बडी वकील मंडळी टिळकांकरिता झटू लागली. टिळकांची जिव्हाळ्याची मंडळी काही परमार्थिक उपयोजना करू लागली. दादासाहेब खापर्डे हे उमरावतीहून मुंबईकडे खटल्याकरिता जाऊ लागले. अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर खापर्डे कोल्हटकरांना बोलले, तुम्ही शेगावी जाऊन गजानन महाराजांना विनंती करा की, टिळकांना यातून सोडवा. खरे पाहता मीच गेलो असतो. पण मी मुंबईला जात आहे. कोल्हटकर हे देखील टिळकांचे भक्त होते. ते लगेच गाडीत बसून शेगाव येथे आले. मठात पोहोचले तो त्यांना श्री महाराज निद्रिस्त आहेत असे कळले. ते महाराजांच्या जागे होण्याची वाट पाहत बसले. पण महाराज सतत तीन दिवस निद्राधीन होते. कोल्हटकरांनी चिकाटीची कमाल केली. तेदेखील सतत तीन दिवस मठात बसून होते. त्यांना टिळकांबद्दल आत्यंतिक कळकळ होती.
चवथ्या दिवशी समर्थ उठले आणि कोल्हटकरांना बोलते झाले, “तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नांना यश येणार नाही. छत्रपतींना रामदास स्वामींचा वशिला होता. पण बादशाही अमलात त्यांना देखील कैद झाली. सज्जनांना त्रास झाल्याविना राज्यक्रांती होत नसते,” असे सांगून महाराजांनी टिळकांना देण्याकरिता एक भाकरी कोल्हटकरांजवळ दिली आणि म्हणाले, “ही भाकरी टिळकांना खाऊ घाला. या भाकरीच्या बळावर टिळक फार मोठी कामगिरी करतील. एवढ्या दूर जात आहेत. पण त्याला काही इलाज नाही.” हे महाराजांचे बोलणे ऐकून कोल्हटकर साशंक झाले. त्यांनी महाराजांजवळून भाकरी घेतली. ती मुंबईला नेऊन टिळकांना खावयास दिली आणि त्यांना संपूर्ण प्रसंग सांगितला. ते ऐकून टिळक उपस्थित लोकांना हसत हसत म्हणाले, “महाराजांचे ज्ञान अगाध आहे. तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही. आपली बाजू राखण्यासाठी सरकार न्याय पालन करणार नाही.” या ठिकाणी दासगणू महाराज यांनी टिळकांच्या मुखातून एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. ते म्हणतात :
जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो। तेव्हा न्याय आठवतो।
हा जगाचा सिद्धांत तो। खोटा होईल कोठूनी?॥ ९४ ॥
माझ्या हाते कामगिरी॥ मोठी होणार आहे खरी।
ऐसे समर्थांची वैखरी। बोलली हे गूढ एक॥ ९५॥
भूत भविष्य वर्तमान। जाणताती साधूजन।
आपण मनुष्य सामान्य। पाहू पुढे काय होते॥ ९६॥
टिळकांनी श्रद्धेने ती प्रसादाची भाकरी मुखात दात नसताना प्रसाद म्हणून कुस्करून खाल्ली. टिळकांना शिक्षा झाली. त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे टिळकांनी भगवत गीतेवरील ‘गीता रहस्य’ हा टीका ग्रंथ लिहिला. हीच त्यांच्या हस्ते झालेली अजून एक महत्त्वाची व मोठी कामगिरी. गीतेवर मोजक्याच मान्यवरांनी भाष्य केले आहे. त्यात कोणी द्वैतपर, कोणी अद्वैतपर, कोणी कर्मपर अशी कालमानानुसार मांडणी केली आहे. टिळकांचे हे कार्य त्यांना अजरामर करून गेले. पुढील ओवी बघता हे सिद्ध होते :
यावच्चंद्रदिवाकर। पुरुष बाळ गंगाधर।
चिरंजीव निरंतर। राहील कीर्तिरूपाने॥१०८॥
पुढे कोल्हापूर येथील श्रीधर गोविंद काळे या चित्पावन ब्राह्मणाचा वृत्तान्त आला आहे. हा गरिबीच्या स्थितीत इंग्रजी भाषा शिकण्याचा उद्देशाने इंग्रजी शाळेत गेला. मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढील शिक्षण घेण्याकरिता कॉलेजमध्ये गेला; परंतु इंटर परीक्षा नापास झाला. म्हणून वर्तमानपत्रे वाचत फिरत राहिला. एकदा ‘केसरी’ वृत्तपत्रात ओयामा टोगो चरित्र त्याच्या वाचण्यात आले. त्या वाचनामुळे आपण देखील या दोघांप्रमाणे विलायतेस यंत्रविद्या शिकावयास जावे आणि ज्याप्रमाणे त्यांनी जपान राष्ट्राला अभ्युदयाप्रती आणले तसेच आपणदेखील करावे, असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. उगाच भार होऊन जगणे काय उपयोगाचे? असे त्याला वाटू लागले. मनात जरी हे विचार असले तरी पैशाची सोय नव्हती तसेच कोणी मदतीलादेखील तयार नव्हते. घरी गरिबी होती. अशा मनःस्थितीत तो आपल्या एका मित्राला भेटण्याकरिता भंडारा येथे आला. हा मित्र तेथील मन्रो हायस्कूलमध्ये शिक्षक होता. या मित्राला श्रीधराने आपल्या मनातील विचार सांगितला. मित्राने त्याला समजावून सांगितले की, मित्रा पैशाशिवाय या जगात काही करता येणे शक्य नाही. तू हा विचार सोडून दे. चल आपण आपल्या गावी कोल्हापूरला जाऊ. असा विचार करून दोघे गाडीत बसले. त्यांनी गजानन महाराजांची कीर्ती ऐकली होती. या साधूंचे दर्शन घ्यावे म्हणून ते दोघे शेगाव येथे उतरले. मठात दर्शनास्तव आले. महाराजांना नमस्कार करून हात जोडून बसले. पाहताक्षणीच महाराजांनी श्रीधराचा मनोदय जाणला व त्याला म्हणाले,
“उगाच परदेशाचा विचार करू नकोस. आपल्या इथे सर्व काही आहे. भौतिक शास्त्राऐवजी अध्यात्माची सेवा कर म्हणजे तू कृतार्थ होशील.” असे महाराजांनी सांगताच श्रीधरच्या विचारात बदल झाला. महाराजांनी आपले विचार कसे ओळखले? हा त्याला प्रश्न पडला. त्यावेळी श्रीधरला कोल्हापूरच्या कुंभार गल्लीमधील गुरूंची आठवण झाली. असे विचार श्रीधरच्या मनात येताच महाराज बोलले,
ऐसे श्रीधर आणिता मनी। महाराज बोलले गर्जोनी।
हिंदुस्थाना सोडूनी। उगाच कोठे जाऊ नको॥१२९॥
अगणित करावे पुण्य। तेव्हाच होते येथे जनन।
या भौतिक शास्त्राहून। योगशास्त्र समर्थ असे॥ १३०॥
ते योगशास्त्र येते ज्याला। तो न मानी या भौतिकाला।
योगशास्त्राहून भला। अध्यात्म विचार श्रेष्ठ असे॥३१॥
तो जमल्यास करून पाही। कोठे न आता जाई येई।
असे समर्थ बोलता पाही। श्रीधर चित्ती आनंदला॥१३२॥
अशा रीतीने महाराजांनी श्रीधर काळे यांचे विचार परिवर्तन करविले. पुढे श्रीधर काळे येथेच राहिले, शिकले. बीए, एमए झाले. शिवपुरी कॉलेज येथे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. पाहा श्रीधर काळे यांच्या जीवनात संतकृपेने सर्व व्यवस्थित घडून आले. असे हे संत याच राष्ट्रात होतात. दासगणू महाराजांच्या शब्दात :
हे पीक संतांचे। याच देशी यावयाचे।
वृक्ष नंदनवनीचे। अन्य ठायी न येती हो ॥१४०॥
क्रमशः
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…