
मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर रोज करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी २ ते ३ मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता प्रसारित करण्यात येणार (Good thoughts) आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या संकल्पनेतून आज या उद्घोषणा प्रणालीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
मंत्रालय हा प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी विविध उद्घोषणा सतत होत असतात. मात्र, याच सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन आता दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर (Shiv thoughts) होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार, पराक्रमाची माहिती व्हावी, दररोज मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी –कर्मचारी यांना या शिवरायांच्या विचारातून उर्जा, चैतन्य, स्फूर्ती मिळावी, दिवसाची सुरुवात चैतन्याने व्हावी, अशी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांची संकल्पना होती. त्यांच्या या संकल्पनेस मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्रालयाच्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन या शिवविचारांच्या जागरास सुरुवात झाली.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.