Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीpersonality : व्यक्तिमत्त्वाचा विसर

personality : व्यक्तिमत्त्वाचा विसर

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

आपण स्वतःचे स्वरूप विसरून गेलो. आज आपल्याला त्याची काही जाणीवच नाही. किती लोकांना माहीत आहे की, आपण आपले स्वरूप विसरून गेलेलो आहोत. लोक देवाचे नामस्मरण करतात पण नामस्मरण करणाऱ्या लोकांना देव म्हणजे काय हे माहीत आहे का? ओळख आहे का? ते नामाचा उच्चार करत एवढेच! ते वाईट नाही. चांगलेच आहे, त्याने पुढे प्रगतीच होते. हे मी का सांगतो आहे. हा विसर जो आहे तो ordinary नाही. तो विलक्षण आहे. त्याला Hypnotism या विषयांत Hypnotic spell असे एक नाव आहे. त्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विसर पडतो. तसे इथे आहे. आपण आपल्या दिव्या रूपाला विसरलो. एवढ्यानेच भागले नाही. आपण स्वतःला दुसरे कुणीतरी समजू लागलो. मी अमूक व मी असा असे आपण म्हणू लागलो. मी अमूक म्हणजे अहंकार व मी असा म्हणजे अभिमान. अहंकार व अभिमान हे जोडीने आपल्या जीवनात चाललेले आहेत व प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी हे आहेत. त्याच्या ठिकाणी जे व्यक्तिमत्त्व आहे, त्याला त्याच्या दिव्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे.

दिव्य स्वरूपाचा विसर पडल्यामुळे त्याला फक्त आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आठव आहे म्हणून आज प्रत्येक व्यक्ती ही स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजते. वास्तविक ती इतरांपेक्षा वेगळी नाहीच आहे. प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळी नाही. मग ती कुठल्याही जातीची असो, कुठल्याही पंथाची असो कारण पंचमहाभुते सर्व ठिकाणी सारखीच आहेत, मन नावाचे तत्त्व सर्व ठिकाणी सारखे आहे, इंद्रिये सर्वांना सारखी दिलेली आहेत, स्मृती- विस्मृती सर्वांना सारखी दिलेली आहे, निद्रा-जागृती सर्वांना सारखी आहे, कुठेही फरक नाही. फरक कुठे आहे, तर तो आहे आकार व संस्कार या ठिकाणी. आकारामुळे व संस्कारामुळे व्यक्तिमत्त्व निर्माण झाले. व्यक्तिमत्त्व हे आकार व संस्कार या दोन्हींमुळे झाले. आकारामुळे प्रत्यक्ष माणूस हा दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही, अगदी जुळी भावंडेसुद्धा एकमेकांसारखी दिसत नाहीत. आपल्याला पटकन दिसत नाही पण दररोज पाहणाऱ्यांना तो फरक कळतो.

प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा आकाराने वेगळी आहे. जगात अब्जावधी लोक आज आहेत, येणार आहेत, येऊन गेलेले आहेत. पण हे दुसऱ्यासारखे दिसत नाहीत. एक बाई दुसऱ्या बाईसारखी नाही व एक पुरुष दुसऱ्या पुरुषासारखा नाही. बाकी सगळे सारखे असते म्हणजे कान, नाक, डोळे सर्वांना असतात. पण वेगळेपण आहे ते आकारात. फरक आहे तो चेहऱ्याच्या ठिकाणी आहे, इथे सर्व महत्त्वाचे आहे याला कळस म्हणतात. शरीर हे मंदिर आहे, तर चेहरा हा कळस आहे. यात सर्व आहे, मेंदूसुद्धा इथेच आहे, सर्व महत्त्वाची इंद्रिये इथेच आहेत. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये चेहऱ्यावर आहेत. शिर हे सर्वात महत्त्वाचे आहे. इथे तुम्हाला आकारावरून ओळखता येते की, हा माझा नवरा, ही माझी बायको म्हणून चेहरा महत्त्वाचा. बाकी सर्व महत्त्वाचे आहेच, पण त्यातही चेहरा कळस आहे. जिथे आवश्यक तेथे असलेली ही विषमता हे परमेश्वराचे वैभव असून ही आकारांतील विविधता विधात्याचे सौंदर्य व कौशल्य दर्शविते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -