सर्व डाळींच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता
नवी दिल्ली : महागाईचा आगडोंब दिवसेंदिवस वाढतच चालला असून सर्वच वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने आता खायचे काय आणि जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यातच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचे समोर आले आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत नऊ टक्क्यांची घसरण आहे. तर गेल्यावर्षी पाच लाख टन डाळीची तूट होतीच त्यात येणाऱ्या वर्षांत ही तूट कायम असणार असल्याचेही या आकडेवारीनुसार निदर्शनास येत आहे.
मागील एक ते दीड महिन्यापासून सर्व प्रकारच्या किराणा मालाचे भाव तेजीत आहेत. त्यात सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, गहू, ज्वारी, पोहे, शेंगदाणे, तेलाचे भाव दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत वाढले आहेत.
यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींचे भाव तेजीतच असतील अशी परस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या देशातील पेरणीच्या आकडेवारीत डाळीच्या लागवडीचे क्षेत्र घटले असल्याची माहिती आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या डाळीच्या लागवडीचे क्षेत्र नऊ टक्के घटले आहे. याचा थेट परिणाम देशातील डाळीच्या एकूण उत्पादनाच्या चार लाख टनाची घट असणार आहे. गेल्यावर्षी देशात आवश्यक असणाऱ्या डाळीतील तूट ही पाच लाख टन होती. यावर्षी ही तूट भरून निघाली नाही, याचा थेट परिणाम भाववाढीवर होणार आहे.
देशात डाळीची तूट निर्माण होण्यामागे बदललेले पाऊसमान हे मुख्य कारण आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागातील राष्ट्रीय खाद्य विषयांच्या माहितीनुसार पाच ऑगस्टपर्यंत देशात १०६.८८ लाख हेक्टरवर सर्व डाळीचे लागवड करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा कमी आहे. गेल्या वर्षी हा आकडा ११७.८७ लाख हेक्टर इतका होता. यानुसार पेरणी मध्ये ९.३२% ची घट झाली आहे. दरवर्षी देशात ४२ ते ४४ लाख टन म्हणजे सर्वाधिक मागणी ही तूरडाळीची असते. मात्र मागील वर्षी पाच लाख टन मालाची घट होती आणि यावर्षी चार लाख टन मालाची घट अपेक्षित आहे. तूर डाळीच्या पेरणी क्षेत्रामध्ये ७.८८ टक्के घट झाली आहे.
महाराष्ट्रात चांगल्या पावसामुळे ४४ हजार हेक्टरवर अतिरिक्त पेरणी झाल्या आहेत. मात्र ही वाढ अत्यल्प आहे. डाळीवर प्रक्रिया झाल्यानंतर हाती पडणारी उत्तम डाळ ही कमी उत्पादित होत असते. याचा थेट परिणाम भाव वाढीवर होतो.
राष्ट्रीय खाद्य मिशन यांनी यावर्षी झालेली पेरणी क्षेत्राची आकडेवारी दिली आहे, यात झालेली तूट स्पष्ट दिसून येते. तूर डाळ, उडीद डाळ, मुगडाळ या डाळीच्या लागवड क्षेत्रामध्ये यावर्षी गतवर्षीपेक्षा घट दिसून येत आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारातील विक्रीवर जाणवत आहे,
देशांतर्गत तूरडाळीचे तूट लक्षात घेत परदेशातून तूरडाळ आयात करण्याचे धोरण सरकार अवलंबत आहे. यामुळे देशांतर्गत वाढलेल्या तुरडाळीच्या भावावर नियंत्रण मिळविण्यात होईल. मात्र देशातील डाळीचे भाव पडले तर त्याचा फटका येथील तूरडाळ उत्पादक शेतकऱ्यांनाच बसणार आहे. यामुळे पुढील वर्षी आणखी क्षेत्र घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील शेतकरी वाचला पाहिजे त्याला भाव मिळाला पाहिजे आणि उत्पादनही वाढले पाहिजे असेच धोरण सरकारने स्वीकारले पाहिजे, अशी मागणी आता होत आहे.
- देशात दरवर्षी सर्व प्रकारच्या डाळीचे उत्पादन १२० ते १२२ लाख टनाच्या जवळपास
- देशात दरवर्षी डाळीची मागणी १२६ ते १२८ लाख टन
- देशभरातील सर्व डाळीच्या पेरणी क्षेत्रात ९.३२% ची घट
- देशात तूरडाळची मागणी ४२ ते ४४ लाख टनाची मात्र उत्पादन ३६ ते ३८ लाख टन
- सर्वात जास्त मागणी असलेली तुरडाळीची पेरणी क्षेत्रात ७.८८ टक्क्यांची घसरण
- बदललेल्या पाऊसमानाचा उत्पादनावर परिणाम
- पाऊस लांबल्याने उडीद आणि मुगाच्या पेरणीवर परिणाम