
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत. बच्चू कडू यांनी शेतकरी (farmer) आणि शेतमजुरांच्या विविध प्रश्नांवर अमरावतीत ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली असून यावेळी केलेल्या भाषणात बच्चू कडू यांनी मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात साप (snake) सोडण्याचा इशारा दिला आहे. येत्या पंधरा दिवसात मजुरांचे प्रश्न सोडवा, अन्यथा मंत्रालयात साप सोडू, अशी धमकी बच्चू कडू यांनी दिली आहे.
बच्चू कडू यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, गावातील मजुरांसाठी कोणतीही योजना नाही. एखाद्या शेतकऱ्याला साप चावला तर त्याच्यासाठी विमा आहे. पण जर एखाद्या मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाहीत. हा कुठला न्याय आहे? याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्याचे मान्य केले. मात्र मंत्रालयातील कृषी सचिव ढवळे त्यात आडकाठी आणत आहेत.
कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी सचिवाला इशार देतो की, त्यांनी येत्या पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही. सापाला जात, धर्म, पंथ नसतो. एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.