Best bus strike: ३५ लाख बेस्ट प्रवासी वाऱ्यावर?

Share

मुंबईकर घरी बसत नाही. वादळवाऱ्यांच्या संकटाला तो मोठ्या धैर्याने सामोरे जातो. त्याच्यामध्ये किती स्पिरीट आहे, याचे कौतुक आपण नेहमी करतो. पण त्याचा उलटा परिणाम आता आपल्याला दिसू लागला आहे का? सहनशीलतेलासुद्धा काही मर्यादा असतात. त्यामुळे आता मुंबईकरांना गृहीत धरून सर्व चालले आहे का?, असा प्रश्न निर्माण होईल. आपण आता बोलत आहोत मुंबईतील बेस्टच्या संपाबाबत. गेल्या सात दिवस सुरू असलेल्या संपामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झाले आहेत, याचा कोणी विचार करताना दिसतो आहे का?, तसे असते तर गेल्या सात दिवसांत संप मिटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले असते. पण दुर्दैवाने तसे प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. वेळेवर कामावर पोहोचायला हवे म्हणून रिक्षा-टॅक्सीसारख्या वाहनांचा आधार घेत खिशाला चाट मारून मुंबईकर हा त्रास सहन करत आहे.

मुंबई शहराची दुसरी लाइफलाइन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे त्यांचे आंदोलन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी असल्या तरी, त्याचा फटका मुंबईकरांना बसला आहे. गरीब बिचारी कुणीही हाका… अशी अवस्था, त्यामुळे नियमित बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झाली आहे. अशा गरीब बिचारी म्हणणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सुमारे ३५ लाख आहे. ते दररोज बेस्टने प्रवास करतात. एक हजार ७०० बस गाड्या मुंबईतील वेगवेगळ्या मार्गावरून धावतात. हंसा, मारुती, टाटा, मातेश्वरी, ऑलेक्षा व स्विच या सात कंत्राटदारांकडे बेस्टने प्रवासी वाहतुकीची जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर बेस्टच्या स्वमालकीचा १ हजार १०० च्या आसपास बस आहेत; परंतु स्वमालकीपेक्षा आज मुंबईत कंत्राटदारांच्या विश्वासावर ज्या बस चालत आहेत, त्यांची संख्या मोठी आहे.

त्यामुळे कंत्राटदारांच्या बेस्ट बसवर काम करणाऱ्या वाहन आणि चालकांनी संप पुकारल्यामुळे त्याचा त्रास मुंबईकर जनता सहन करत आहे. याबाबत बेस्ट प्रशासनाची भूमिका समोर येते, ती मुळात बचावात्मक आहे. बेस्ट म्हणते की, ते कर्मचारी आपले नसून आपला यात काही संबंध नाही. हा संघर्ष कंत्राटदार व कर्मचाऱ्यांमधील आहे, तो त्यांनी त्यांच्या पातळीवर सोडवावा, अशी भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली आहे. बस गाड्या न पुरवल्याबद्दल आपण कंत्राटदारांकडून दंड आकारून आपले नुकसान भरून काढत आहे, असा दावाही बेस्ट प्रशासनाने केला आहे. मात्र यात गैरसोय ही बेस्टच्या प्रवाशांची होत आहे हे बेस्टने कसे विसरून चालेल. शेवटी बेस्टच्या लौकिकाचा प्रश्न आहे. प्रवासी हा बेस्ट गाड्यांच्या विश्वासावर प्रवास करत असतो. त्यामुळे कंत्राटदार आणि कर्मचारी यांच्यातील वाद असला तरी, बेस्ट प्रशासनाने त्यावर सन्मानजनक तोडगा काढून प्रवाशांची गैरसोय टाळली पाहिजे.

वरवर पाहता असे कंत्राटदारांच्या कंपन्यांचे संप हा बेस्ट प्रशासन आणि प्रवाशांना नवीन नाही. मागील ऑक्टोबर महिन्यात मातेश्वरीच्या सांताक्रूझ, मजास व प्रतीक्षा नगर आगारातील बस कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. या कंत्राटदारांच्या चालक व वाहकांनी हे आंदोलन दिवाळी बोनस व पगार वाढीसाठी करत ४०० हून अधिक गाड्या जागीच उभ्या ठेवल्या होत्या. त्यानंतर पुन्हा टाटा मोटर्स लिमिटेडच्या शिवाजीनगर आगारातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते. बेस्ट प्रशासनाने या कर्मचाऱ्यांकडून बस प्रवासात तिकीट आकारणी केल्याने हे कर्मचारी संतप्त झाले होते व बेस्टमधून प्रवास करण्यासाठी आपल्याला कंत्राटदारांकडून मोफत बसपास मिळावा यासाठी ते आंदोलन सुरू झाले होते. आता सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे आम्हाला बेस्टच्या सेवेत सामील करून घ्या, ही मागणी मुख्य असल्याचे सांगण्यात येते. बेस्ट प्रशासनातील कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हीही सेवा देतो, त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी नोकरी हवी, असे या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीने कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मागील दोन वर्षांत तीन ते चार तीव्र आंदोलने केली गेली, मात्र यात भरडला गेला तो सामान्य प्रवासी. या प्रकरणी बेस्टने सदर कंत्राटदाराकडून खुलासा करून घेणे आवश्यक आहे. बरे कंत्राट भरणारा एक आहे. बस पुरवठा करणारा एक आहे. कर्मचारी पुरवठा दुसराच करतो आहे, तर नियोजन करणारा दुसराच आहे, अशी पुरवठादारांची साखळी निर्माण झाली आहे.

त्यामुळे बेस्टकडून नियमित वसुली करणारा एक आहे, तर खालच्या साखळीपर्यंत पोहोचणारा हा दुसराच आहे, असे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे पैशांचे विभाजन होते व शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत कमी पैसे पोहोचतात व वेतन कमी येते व वरच्या पातळीवर मोठा भ्रष्टाचार होतो असा आरोप कर्मचारी करत आहेत. हा तिढा सुटणे तितकेच महत्त्वाचे आहे. बेस्ट प्रशासनाने आपले हात कितीही झटकले तरीही किंवा आपला यात काय संबंध असे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जेव्हा प्रवाशांचा थेट संबंध येतो तेव्हा मात्र बेस्टला याची दखल घेणे क्रमप्राप्तच आहे.

Recent Posts

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

15 mins ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

17 mins ago

Worli Hit and Run : ‘कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!’ गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…

57 mins ago

Dombivali Fire : डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! सोनरपाड्यात कारखान्याला भीषण आग

परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…

1 hour ago

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

2 hours ago

Jalna News : अ‍ॅक्शन मोड! बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड

कपाट भरून गर्भपाताची औषधे, लाखोंची रोकड पाहून अधिकाऱ्यांच्या उंचावल्या भुवया जालना : महाराष्ट्रात गर्भवती महिलांची…

2 hours ago