
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
"ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरीरीनं मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.