
९ सामन्यांच्या वेळापत्रकात आयसीसीने केला बदल
लंडन (वृत्तसंस्था) : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. क्रिकेटच्या मैदानात होणारा हा महासंग्राम १५ ऑक्टोबर ऐवजी आता १४ ऑक्टोबरला म्हणजेच एक दिवस आधी होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. विश्वचषकाच्या वेळापत्रकात आयसीसीने बदल केला असून सुधारित वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. या सामन्यासह विश्वचषकातील एकूण ९ सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
आयसीसीच्या सुधारित वेळापत्रकानुसार इंग्लंड विरुद्ध बांगलादेश हा सामना १० ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढत १० ऑक्टोबरला रंगेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना १२ ऑक्टोबरला होईल. न्यूझीलंड-बांगलादेश हे संघ १३ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे महायुद्ध १४ ऑक्टोबरला होईल. इंग्लंड-अफगाणिस्तान सामना १५ ऑक्टोबरला होईल. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ ११ नोव्हेंबरला भिडतील. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान मैदानी जंग ११ नोव्हेंबरला होईल. भारताचा नेदरलँडविरुद्धचा सामना १२ नोव्हेंबरला होईल.
पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. गतविजेते आणि उपविजेत्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये पाच ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ही उद्घाटनीय सामना होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामनाही नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच होणार आहे. भारताची सलामीची लढत ऑस्ट्रेलियाविरोधात ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याने यजमान भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करेल. यंदाचा विश्वचषक १० संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे.
भारताच्या दोन सामन्यांमध्ये बदल
भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १० संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने विश्वचषक स्पर्धेचे सामने होणार आहेत. स्थानिक स्थिती आणि काही संघांच्या विनंतीनंतर आयसीसीने विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल केला. आयसीसीने नऊ सामन्यांच्या तारखा बदलल्या आहेत. यामध्ये भारताच्या दोन सामन्यांचा समावेश आहे.