
मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ झाल्याने मुंबई महानगरपालिकेने अखेर पाणीकपातीचा (Watercut) निर्णय मागे घेतला आहे. (Good news) या सातही जलाशयांमध्ये ८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
यावर्षी राज्यात मान्सूनचे आगमन उशीरा झाले होते. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये अगदी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावले होते. पण जुलैअखेर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सध्या वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.
मुंबईसह महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी या जलाशयांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका उपयुक्त पाणीसाठा असावा लागतो. पण हा जलसाठा जून महिन्याच्या अखेरीस १ लाख ४१ हजार ३८७ दशलक्ष लिटर म्हणजेच ९.७७ टक्के इतकाच उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यामुळे पावसाअभावी शनिवार दिनांक १ जुलै २०२३ रोजी संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यासंदर्भातली माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील १० टक्के कपात लागू करण्यात आली होती.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पण यंदा मान्सूनने उशीरा हजेरी लावल्याने या जलाशयांमधील पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून महापालिकेकडून दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता मुंबईकरांची चिंता मिटली आहे.