Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाका येथे उद्या बोंबाबोंब आंदोलन

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाका येथे उद्या बोंबाबोंब आंदोलन

कोकणातील मंत्री, खासदार, आमदार यांना बोलतं करण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी पुन्हा एकदा रायगडमधील पत्रकार रस्त्यावर उतरणार!

नागरिकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) जीवघेणे खड्डे तात्काळ भरावेत आणि गेली १२ वर्षे रखडलेले महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, या मागणीसाठी कोकणातील पत्रकार बुधवारी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत. वाकण नाक्यावर हे आंदोलन होणार असून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे..

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु आहे. सरकारने वेळोवेळी अनेक वादे केले. पण काम पूर्ण झाले नाही. चौपदरीकरण तर होत नाहीच उलट रायगड जिल्ह्यात या रस्त्याची चाळण झाली असल्याने हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे. मात्र सत्ताधारी आणि कोकणातील लोकप्रतिनिधी या खड्ड्यांबाबत आणि महामार्गाबाबत कमालीचे मौन बाळगून आहेत. त्यामुळे कोकणातील मंत्री, खासदार, आमदार यांना बोलतं करण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आणि कोकणातील लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी बुधवारी पुन्हा एकदा रायगडमधील पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरत आहेत.

परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत. कोकणातील जनतेने आंदोलनात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींना जाब विचारावा, असे आवाहन मनोज खांबे आणि रायगड प्रेस क्लबने केले आहे.

१० हजार एसएमएस पाठवणार

महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल लोकप्रतिनिधींना जाब विचारणारे दहा हजार एसएमएस पाठविले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे यांना हे एसएमएस ९ ऑगस्टच्या सकाळपासून पाठविले जाणार आहेत. रायगडातील नागरिकांनी या एसएमएस आंदोलनात सहभागी होऊन आपल्या तीव्र भावना लोकप्रतिनिधींच्या थेट कानावर घालाव्यात, असे आवाहनही रायगड प्रेस क्लबने केले आहे.

रायगडमधील पत्रकारांच्या बोंबाबोंब आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ आपल्या तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपला संताप व्यक्त करतील, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -