Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीFund allocation: निधीवाटपावरुन हमरीतुमरी, जालन्यातही वातावरण तापले!

Fund allocation: निधीवाटपावरुन हमरीतुमरी, जालन्यातही वातावरण तापले!

जालना: ज्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, ज्या मुद्द्यावरुन शिवसेनेत फूट पडली, त्याच विकास निधीच्या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा सरकारमधील तीनही पक्षाचे नेते आमने सामने आले आहेत. निधी मिळत नसल्याने औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिवसेना ठाकरे गटाचा वाद पाहायला मिळाला, तर दुसरीकडे जालन्यातील (Jalna) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळत नसल्याचं म्हणत भाजप नेते आणि पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांना घेराव घालत घोषणाबाजी केली.

जालन्यात सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, याच बैठकीवरुन शिवसेनेतील नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला निधी देताना अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. तर, विकास निधी मंजूर करत असताना शिवसेनेच्या लोकांना डावलल्याचा आरोप करत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, जिल्हा संपर्कप्रमुख पंडित भुतेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सावे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच घेराव घातला.

सावे यांनी सभ्यतेची भाषा ओलांडली: खोतकर

दरम्यान यावर शिवसेनेचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिकिया दिली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी पालकमंत्री सावे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. असे व्हायला नको होते, मात्र झाले. जे घडलं त्याचं समर्थन मी करत नसलो, तरीही सभ्यतेची भाषा पालकमंत्री यांनी ओलांडली आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सावे यांना असा अपमान करण्याचा काही अधिकार दिलेला नाही. सावे सातत्याने अपमान करण्याचा प्रयत्न करतात. आमचे पदाधिकारी त्यांचे हक्क मागण्यासाठी गेले होते, पण सावे यांचे असं वागणं बरं नव्हे, असे खोतकर म्हणाले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मुद्दा मांडणार

विकास निधी देताना दुजाभाव होत असून, याची नोंद कागदोपत्री आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली जाणार असल्याचं देखील अर्जुन खोतकर म्हणाले आहे. त्यामुळे आगामी काळात विकास निधीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -