
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ठाकरे गटाला कडक शब्दांत इशारा
नवी दिल्ली : विरोधकांनी दिलेल्या मणिपूरबाबतच्या अविश्वास प्रस्तावाववर (No confiedence Motion) लोकसभेत चर्चा सुरु आहे. लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक (Rulers and Opponents in Loksabha) यांच्याच चांगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे. आज मणिपूर विषयावर बोलताना शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), ठाकरे गटाकडून अरविंद सावंत (Arvind Sawant) तर भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) बोलायला उभे राहिले. यावेळेस श्रीकांत शिंदे यांनी मविआला अनेक टोले लगावले. यावर अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पळपुटे म्हटले. या टीकेवर नारायण राणे संतापले आणि त्यांनी शिवसेनेची बाजू घेत ठाकरे गटाला खडसावले.
मंत्री नारायण राणे म्हणाले, अविश्वास प्रस्तावावर अनेकांची भाषणे ऐकली, आत्ताच अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलो आहे असं वाटलं. अविश्वास प्रस्तावावर सावंतांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्याचे काम केले. हिंदुत्वाची भाषा केली. उद्धव ठाकरे गटाचे हिंदुत्वाबाबत बोलले. हिंदुत्वाबद्दल इतकं प्रेम होतं मग २०१९ मध्ये सत्तेसाठी शरद पवारांसोबत गेले तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही का? असा खडा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, हिंदुत्व आणि खऱ्या शिवसेनेबाबत बोलतात पण अरविंद सावंत शिवसेनेत कधी आले? मी १९६६ चा शिवसैनिक आहे. हे आम्हाला शिवसेनेबाबत बोलणार का? मी पक्ष सोडला, २२० लोकांनी आंदोलन केले होते. आता काहीच शिल्लक नाही. आता आवाज येतोय तो मांजराचा आहे, वाघाचा नाही. पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची औकात नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे बोट दाखवाल तर तुमची औकात दाखवू असा इशारा राणेंनी दिला.