
रायगडसह राज्यातील संतप्त नाभिक समाज १५ ऑगस्टला धडक मोर्चा काढणार
- संतोष रांजणकर
मुरूड : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कु. निलिमा चव्हाण हिचा मृत्यू आकस्मित नसून तो एक घातपाताचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांनी कसून चौकशी करावी आणि निलिमा चव्हाण हिला व तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती अनेक जणांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यात आता रायगड जिल्ह्यातील संतप्त नाभिक समाजानेही १५ ऑगस्टला पोलीस अधीक्षक, रत्नागिरी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
नाभिक समाजाची ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील कु. निलिमा सुधाकर चव्हाण ही अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी. दापोली येथील भारतीय स्टेट बँकेत नोकरीस होती. शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी बँकेची सुट्टी झाल्यानंतर चिपळूण येथील घरी येत असताना ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दाभोळच्या खाडीत मंगळवार दि. ०१ ऑगष्ट २०२३ रोजी सापडला.
निलिमा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची पोलीस प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने तातडीने सखोल चौकशी करून तपास करावा. असे अमानुष व अमानवी कृत्य करणाऱ्या संशयितांचा तपास होऊन कठोर शासन करावे, अशी मागणी नाभिक समाजातर्फे मुरुड तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, शहर अध्यक्ष विश्वास चव्हाण व महिला तालुका अध्यक्ष वृषाली चव्हाण यांनी समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार रोहन शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाभिक समाजाची कु. निलिमा सुधाकर चव्हाण रा. ओमळी, ता. चिपळूण ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेमध्ये नोकरीला होती. शनिवार दिनांक २९ जुलै २०२३ रोजी आपल्या घरी म्हणजे ओमळी येथे येण्यासाठी निघाली. दापोली बस स्थानकामध्ये चिपळूणकडे जाणाऱ्या एसटीमध्ये ती बसली. मात्र ती चिपळूणला पोहोचलीच नाही. शोधाशोध करूनही न सापडल्याने तिच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. परंतु पोलिसांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न देखील केले नाही. अखेर दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दाभोळ ता. दापोली येथील खाडीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला.
कुमारी निलिमा सुधाकर चव्हाण हिचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला ते पाहता हा घातपात असावा अशी शक्यता जास्त आहे. कारण तिच्या डोक्यावर सर्व केस आणि दोन्ही भूवया पूर्ण नष्ट करण्यात आल्याची दिसून येत होते. तिच्यावर अत्याचार करून आणि नंतर तिला अशा प्रकारे विद्रूपकरून खाडीमध्ये फेकून देण्यात आले का? याचाही तपास होणे आवश्यक आहे. तथापि दापोली पोलिसांकडून शोध घेण्यास त्यांना अपयश आले आहे.
तरी आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो की, आमच्या भगिनीचा घातपाताचा त्यादृष्टीने १२ ऑगस्टपर्यंत तपास व्हावा व सुधाकर चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. अन्यथा आम्ही सर्व रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ समाज बांधव संपूर्ण ताकदीनिशी १५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस अधीक्षक रत्नागिरी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहोत. या झालेल्या घृणास्पद प्रकाराचा आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करीत आहोत. योग्य तपास न झाल्यास रत्नागिरी रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवून आंदोलन छेडण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. तरी ही गंभीर बाब लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडे त्वरित सादर करून या गुन्ह्याचा स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास करण्याचे आदेश तत्काळ देण्यात यावे व गुन्हेगारांवर कठोर शिक्षा करण्यात यावी, असे नाभिक समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, शहर अध्यक्ष विश्वास चव्हाण, महिला तालुका अध्यक्ष वृषाली चव्हाण, प्रभाकर कोलवणकर, राज पवार, राजू पवार, उदय आयरकर, जगदीश आयरकर, राजेश गायकवाड, प्रवीण रावकर, प्राजक्ता चव्हाण, श्रद्धा गायकवाड यांसह समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.