आयुक्तांच्या हस्ते पहिल्या फेरीचे उद्घाटन
पनवेल: बालके सदृढ रहावी, यासाठी मिशन इंद्रधनुष्य ५.० राबविले जात आहे. महापालिका क्षेत्रात लसीकरणासाठी पालिकेच्यावतीने नेहमीच जनजागृती केली जाते. आपल्या मुलांचे भविष्य उज्वल, सदृढ बनवायचे असेल तर बालकांच्या पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. लसिकरणापासून वंचित राहीलेल्या बालक व गर्भवती महिलांनी या लसीकरण मोहिमेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनआयुक्त गणेश देशमुख यांनी केले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके तसेच गर्भवती महिला लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतील पहिल्या फेरीचे सोमवारी(७ ऑगस्ट) पीर करीम अली शाह उर्दू शाळेत आयुक्त देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक मुकीत काझी, डॉ. सुरेखा मोहकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. नेहा म्हात्रे, परिचारीका, आशा वर्कर्स, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी माजी नगरसेवक मुकीत काझी व डॉ. सुरेखा मोहकर यांनी उपस्थितांना लसीकरणाचे महत्व सांगितले. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांनी मोहिमेची माहिती देऊन तीन टप्प्यात होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाचे वेळापत्रक सांगितले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी तळागाळापर्यंत हा लसीकरणाचा कार्यक्रम पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. अर्धवट झालेले लसीकरण, लसीकरण न झालेली बालके ही संपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांच्या तुलनेत लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराच्या दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी ऑगस्टपासून तीन टप्प्यांमध्ये विशेष ही मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे.
या मोहिमेंतर्गत शून्य ते दोन वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. यात पालिका क्षेत्रात २१९३ लाभार्थ्यांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर गर्भवती महिलांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर तर तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणार आहे .
पालिकेकडून यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून या मोहिमेंतर्गत पालिका क्षेत्रातील एकही
बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीत २२० ठिकाणी लसीकरण सत्रे सुरू करण्यात आली आहेत.