
नितेश राणे यांचा खडा सवाल
ठाकरे पिता-पुत्रांचाही घेतला समाचार
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते आणि कोसला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी एका कार्यक्रमात बोलताना अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यामुळे हिंदू मने दुखावली गेली असून अशा लोकांना पुरस्कार द्यायचा का असा थेट सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता मुंबईतील टोलविषयी बोलणार्या व गुजराती आणि मारवाडी लोकांवर द्वेष दाखवणार्या ठाकरे पिता-पुत्रावरही हल्लाबोल चढवला आहे.
नितेश राणे म्हणाले, काही दिवसांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांनी औरंग्याला मोठं करण्याच्या आणि इतिहासामध्ये शिवरायांना औरंग्यापेक्षा लहान दाखवण्याच्या षडयंत्राला खतपाणी घातले. औरंग्या हिंदूद्वेष्टा नव्हता, असं भालचंद्र नेमाडे एका कार्यक्रमात म्हणाले. ज्याने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदू महिलांवर, समाजावर अत्याचार केला, धर्मांतरं घडवून आणली अशा औरंग्याला मोठं करण्याचं जे काम महाराष्ट्रात चाललं आहे, त्याला खतपाणी घालण्याचं काम भालचंद्र नेमाडेंसारख्या लोकांकडून होत आहे. अशा लोकांना आमच्या देशामध्ये पुरस्कार द्यायचे का? आणि दिलेले पुरस्कार सरकारने परत घेतले पाहिजेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
सगळे कॉन्ट्रॅक्ट हायवे कन्स्ट्रक्शनलाच का?
संजय राऊत सकाळच्या पत्रकार परिषदेत असे किंवा सामनामध्ये असो, केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना महाराष्ट्र किती कळतो यावर आपले अकलेचे तारे चमकवलेले आहेत. तेव्हा जशी ब्रिटीशांची ईस्ट इंडिया कंपनी होती तशी या ठाकरेंची हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे का? कारण कोविडचा काळ असो किंवा महापालिकेच्या यांच्या सत्तेचा काळ असो, सगळे कॉन्ट्रॅक्ट फक्त हायवे कन्स्ट्रक्शनला देण्यात यायचे. पण मग वैभव चेम्बर्समध्ये बसून कोण कोण किती किती गुजराती आणि मारवाडी व्यापार्यांना भेटायचा याची माहिती आम्ही महाराष्ट्राला देऊ का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
पुन्हा वसुली चालू करायचा हा धंदा
आज गुजराती आणि मारवाडी लोकांवर जो द्वेष दाखवला जातोय, मातोश्री २ हे कुठल्या गुजराती आणि मारवाडींच्या पैशांवर तयार झालंय याची थोडी माहिती द्यावी. कालपासून जो पेंग्विन तडफडतोय, काल त्याने पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील टोल बंद करावेत असं म्हटलं. मातोश्रीतील टोल बंद झाल्यामुळे आता या लोकांना मुंबईतील टोल आठवले आहेत. सगळं खर्चपाणी बंद झाल्याने अप्रत्यक्ष पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरांना यानिमित्ताने भडकवायचं आणि परत हप्ते चालू करायचे, वसुली चालू करायची हा त्यांचा धंदा आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला.