
या प्रकरणात कंपनीचं म्हणणं काय?
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर (Nitin Desai Suicide Case) त्यांच्या आत्महत्येची कारणे समोर येत आहेत. एडलवाईज कंपनीकडून (Edelweiss Company) घेतलेले कर्ज फेडता न आल्याले कंपनीने नितीन देसाईंचा मानसिक छळ केला आणि त्यातूनच नितीन यांनी आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांनीही एडलवाईज कंपनीवर नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
नितीन देसाई कर्जाची रक्कम फेडण्यास तयार होते असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. नितीन देसाईंची पत्नी नेहा (Neha Desai) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपने कर्ज वसुलीसाठी नितीन देसाईंवर मानसिक दबाव टाकला, त्यामुळे त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. कंपनीने तोडगा काढण्याचा प्रयत्न न करता केवळ त्रास दिला. नितीन देसाईंची पत्नी नेहा यांनी एडलवाईस ग्रुप आणि ईसीएल फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध लेखी तक्रार दिली होती आणि एफआयआर दाखल केला होता.
कंपनीचं म्हणणं काय ?
याप्रकरणी कंपनीच्या वक्तव्यानुसार, कलादिग्दर्शकावर कोणताही दबाव टाकण्यात आला नव्हता. कंपनीने जास्त व्याजही घेतले नव्हते असे निवेदन देखील कंपनीने प्रसिद्ध केले आहे. एडलवाईस कंपनीने स्टॉक मार्केटला (Stock Market) पत्र पाठवून सांगितले की, आर. बी. आय. (RBI) च्या नियमांनुसारच कायद्यामध्ये राहून कारवाई केली होती. कोणत्याही कर्जदारावर कर्ज वसुलीसाठी दबाव टाकला नाही. असं या पत्रात नमुद केलं आहे. मात्र, या प्रकरणानंतर एडलवाईस कंपनीचे शेअर्स ८५ पैशांनी घसरले आहेत.