प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला
मुंबई : उबाठा गटाच्या वतीने काल संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) आयोजित केलेल्या एका मेळाव्यात उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप नेते तसेच देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली. या टीकेला भाजपचे नेते चोख प्रत्युत्तर देत आहेत. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. तर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar)यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, आज उद्धव ठाकरेंना संभाजी ब्रिगेडचा आसरा घ्यावा लागतो आहे, कारण आपल्या सभांना शिवसैनिक येतील का हा प्रश्न त्यांना पडला असेल. ठाकरेंनी कायम मराठा नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मग नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकांना त्यांनी बाजूला केले.
कालच्या उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यांना उत्तर देतांना दरेकर म्हणाले की, भगवा तुम्हाला सांभाळता आला नाही यात दोष कोणाचा? आम्ही देशविरोधींची थडगी उद्ध्वस्त केली आणि तुम्ही याकूब मेमनच्या थडग्याचं उद्दतीकरण करत बसलात. त्यामुळे आपल्याला हिंदुत्वाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आपली हिंदुत्वाची व्याख्या काँग्रेसला मान्य आहे का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचा उल्लेख आशिष शेलार यांनी घरबशा केला. मात्र तो आता बदलून घरकोंबडा करावा लागेल कारण ते घरातून आरवतात’. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मस्टर मंत्री म्हटल्यामुळे दरेकर म्हणाले, ‘ते देवेंद्रजींवर टीका करतात कारण त्यांनी ठाकरेंच्या नाकाखालून सरकार नेलं. त्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली टीका हा बालिशपणा आहे’, असा दरेकरांनी हल्ला चढवला.