- मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे
मुंबई शहराची दुसरी लाइफलाइन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील चार दिवसांपूर्वीपासून सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे पुन्हा एकदा भरडले आहेत ते बेस्टचे प्रवासीच. संप आहे कंत्राटदारांच्या कंत्राटी कामगारांचा आणि भरडले गेले आहेत प्रवासी. वास्तविक पाहता हे प्रकरणच कंत्राटदार व त्यांच्या कामगारांबद्दलचे आहे. मात्र नाहक त्रास हा बेस्टच्या प्रवाशांना होत आहे. यात बेस्ट प्रशासनाने आपले हात कितीही झटकले तरी व आपला यात काय संबंध असे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी गोष्ट जेव्हा प्रवाशांपर्यंत येते तेव्हा मात्र बेस्टला याची दखल घेणे कर्मप्राप्तच आहे. वरवर पाहता हे असे कंत्राटदारांच्या कंपन्यांचे संप (संप म्हणण्यापेक्षा काम बंद आंदोलन म्हणू या) हे सध्या तरी बेस्टला व तसे पाहता प्रवाशांना नवीन नाही. मागील ऑक्टोबर महिन्यात मातेश्वरीच्या सांताक्रूज, मजास व प्रतीक्षा नगर आगारातील बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. या कंत्राटदाराच्या चालक व वाहकांनी हे आंदोलन दिवाळी बोनस व पगारवाढीसाठी केले असल्याने ४०० हून अधिक बस गाड्या जागीच उभ्या राहिल्या होत्या. पुन्हा सप्टेंबर २२ मध्ये टाटा मोटर्स लिमिटेडच्या शिवाजीनगर आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते.
बेस्ट प्रशासनाने या कर्मचाऱ्यांकडून बस प्रवासात तिकीट आकारणी सुरू केल्याने हे कर्मचारी संतप्त झाले होते व बेस्टमधून प्रवास करण्यासाठी आपल्याला कंत्राटदाराकडून मोफत बसपास मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू झाले होते, याचे लोण नंतर वरळी, मालवणी व बेकबे आगारापर्यंत पोहोचले होते. मागील जुलै महिन्यातच वडाळा आगारातील एमपी ग्रुपमार्फत चालवण्यात येणाऱ्या या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंत्राटदाराने काही महिन्यांचे वेतन दिले नव्हते. वडाळा आगारापासून सुरू झालेली हे काम बंद आंदोलने नंतर मग वांद्रे, कुर्ला, कुलाबा ते विक्रोळी आगारापर्यंत पोहोचले. या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांकडून मागील दोन वर्षांत तीन ते चार तीव्र आंदोलने केली गेली, मात्र यात भरडला गेला तो सामान्य प्रवासी. हे आंदोलन नंतर इतके तीव्र झाले की आपल्या मागण्या मागता मागता कर्मचारी इतके थकले की सर्व गोष्टींवर पाणी सोडून बेस्टलाच त्यांनी रामराम ठोकला. त्यामुळे त्या एमपीजी या कंत्राटदाराचे नाव खराब झाल्यामुळे अवस्था इतकी वाईट झाली. त्याला जुने कर्मचारी सोडून. गेले ते गेले व नवे कर्मचारी मिळेना. त्यामुळे आहे त्या अवस्थेत आपल्या बसेस त्याच स्थितीत टाकून त्याला रातोरात आपला गाशा गुंडाळावा लागला आणि अशा प्रकारे बेस्ट उपक्रमातून आधी पीएनएम व नंतर एमपीजी ग्रुप यांनी आपला गाशा गुंडाळला. आता सध्या हीच परिस्थिती बेस्ट अनुभवत आहे.
सध्या बेस्ट उपक्रमात सात कंत्राटदार आहेत. हंसा मारुती, टाटा मातेश्वरी, ऑलेक्षा व स्विच यांच्या मिळून १ हजार ७७१ बस गाड्या आहेत व स्वमालकीचा १ हजार १०० च्या आसपास बस आहेत. कंत्राटाच्या बस गाड्या स्वमालकीच्या बसपेक्षा जास्त आहेत व यापुढेही स्वमालकीचा बस ताफा कमी करत व त्या जागी नव्या बस न घेता कंत्राटदारांच्या बस कशा प्रकारे घेता येतील. यावर बेस्टचा जोर असणार आहे. केंद्र सरकारच्या अवजड वाहतूक विभागाकडून इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्यासाठी सवलत मिळते. मात्र या सवलतीचा फायदा बेस्ट स्वतः न घेता कंत्राटदारांच्या मार्फत घेत आहे त्यामुळे सवलतीचा मिळालेला पैसा हा थेट कंत्राटदाराच्या खिशात जात आहे. यासाठी येत्या काळात पाच हजार ते सहा हजार बसच्या निविदा काढण्यात आल्या असून तीन हजार बसच्या ऑर्डर या आधीच देण्यात आल्या आहेत. म्हणजे येत्या काळात बेस्टच्या ताफ्यात खासगी बस वाढणार हे निश्चितच आहे. मात्र आतापर्यंतचे कंत्राटदारांचे अनुभव बघता बेस्टला या कंत्राटदारांवर किती प्रमाणात अवलंबून राहावे लागणार याचा विचार आत्ताच केला पाहिजे. आताच्या काम बंद आंदोलनादरम्यान उपयोगात आल्या त्या बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्या व स्वतःचे कामगार जे या दिवसात दिवस-रात्र व जादा काम करून प्रवाशांची गैरसोय टाळून बेस्टचा नावलौकिक जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढे हाही कर्मचारी वर्ग नसेल व कंत्राटदारावरच बेस्ट विसंबून राहणार असेल, तर मात्र पुढे भीतिदायक अवस्था वाढवून ठेवली असेल हे निश्चित.
या कंत्राटदारांनी जे काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे ते बरोबर आहे की चूक हे ज्यांनी त्यांनी ठरवावे, कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने ते बरोबरही असू शकेल. गेली अनेक वर्षे नोकरी करूनही वेतनात वाढ होत नाही. उलट मुंबईतील वाढती रहदारी व कष्टप्रद काम पाहता व बेस्टची ड्युटी पाहता वेतनात सुधार होत नाही व दुसरीकडे इतर वेळेत कामे करता येत नाहीत, त्यामुळे मेटाकुटीला आलेला हा वर्ग उलट वरिष्ठांकडून आणखी भरडला जातो तेव्हा सक्षम नेतृत्व नसतानासुद्धा आंदोलनात उत्स्फूर्तपणे उतरतो तेव्हा कुठेतरी काहीतरी कमी आहे व आंदोलने हे दखलपात्रच ठरते. या आंदोलनाला सध्या कोणतेही नेतृत्व नाही व दिशाही नाही, बरे प्रत्येक कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक कंत्राटदारांच्या बेस्ट बरोबरचा झालेला करार वेगळा आहे, कर्मचाऱ्यांशी केलेला करार वेगवेगळ्या स्वरूपातील आहे तरी पण आपल्या सर्वांच्या समस्या एकच आहेत व आपण यात भरडले जात आहोत. या भावनेने सर्व कंत्राटदारांचे कर्मचारी एका छताखाली एकत्र आले आहेत. यात बेस्टने हे कर्मचारी आपले नसून आपला यात काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. उक्त कंत्राटदार व कर्मचाऱ्यांमधील हा संघर्ष आहे तो त्यांनी त्यांच्या पातळीवर सोडवावा अशी भूमिका बेस्टची आहे, बस गाड्या न पुरवल्याबद्दल आपण कंत्राटदारांकडून दंड आकारून आपले नुकसान भरून काढत असल्याचे बेस्टचे म्हणणे आहे. मात्र यात गैरसोय ही बेस्टच्या प्रवाशांची होत आहे. हे बेस्टने विसरून चालणार नाही. शेवटी बेस्टच्या लौकिकाचा प्रश्न आहे हा, या प्रकरणी बेस्टने सदर कंत्राटदाराकडून खुलासा करून घेणे आवश्यक आहे. बरे कंत्राट भरणारा एक आहे. बस पुरवठा करणार एक आहे, कर्मचारी पुरवठा दुसराच करतो आहे. नियोजन करणारा दुसराच आहे. अशी पुरवठादारांची साखळी निर्माण झाली आहे. त्यामुळे बेस्टकडून नियमित वसुली करणारा एक आहे. खालच्या साखळीपर्यंत पोहोचणारा हा दुसराच आहे. त्यामुळे पैशांचे विभाजन होते व शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत कमी पैसे पोहोचतात व वेतन कमी येते व वरच्या पातळीवर मोठा भ्रष्टाचार होतो. असा आरोप कर्मचारी करत आहे. हा तिढा सुटणे खूपच आवश्यक आहे. त्यासाठी बेस्ट उपक्रम पालकमंत्री, मुख्यमंत्री, कामगार यांनी एकत्र येऊन तोडगा काढावा. कुणीतरी नमते घ्यावे हीच आशा मुंबईकर प्रवासी ठेवून आहेत. कर्मचाऱ्यांनी वेळीच एक पाऊल मागे घेऊन मार्ग काढला नाही तर यांची अवस्थाही एसटी कर्मचाऱ्यांसारखीच होईल. संप चालला सहा महिने मात्र पदरी काय पडले तर शून्य.