
सीआरपीएफमधील कॉन्स्टेबल पत्नीचा कट दिल्ली पोलिसांकडून उघड
भरतपूर : राजस्थानमधील सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल असलेल्या महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची दिल्लीमध्ये हत्या करून नंतर तिच्या प्रियकराने भरतपूरमधील बानसूर येथे खड्डा खोदून त्यात या व्यक्तीचा मृतदेह पुरल्याचा धक्कादायक उलगडा झाला. त्यातच या महिलेचा प्रियकरसुद्धा सीआरपीएफमध्ये असल्याचे समोर आल्याने संपूर्ण राजस्थान हादरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुळचा राजस्थानमधील असलेला संजय जाट हा पत्नी पूनम जाट हिच्यासह सध्या दिल्लीमध्ये राहत होता. त्याची पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर तैनात आहे. तिचे बानसूर मधील रहिवासी आणि सीआरपीएफमध्येच असलेल्या रामप्रताप सोबत अफेअर सुरू होते. दरम्यान पती मारहाण करतो असे सांगून पूनम हिने प्रियकर राम प्रताप याला दिल्लीत बोलावून घेतले.
राम प्रताप हा दिल्लीला आल्यावर ३१ जुलै रोजी दोघांनीही मिळून संजय जाट याची हत्या केली. त्यानंतर राम प्रताप हा संजयचा मृतदेह घेऊन बानसूर येथे आला. तिथे त्याने आपल्या घराच्या जवळ असलेल्या जागेत खड्डा खोदून हा मृतदेह पुरून टाकला. या दरम्यान संजयच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता त्यांना संजयची पत्नी पूनम हिच्यावर संशय आला. तिची कसून चौकशी केली असता सुरुवातीला तिने आडेवेडे घेतले. मात्र पोलिसी हिसका दाखवल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास राम प्रताप याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार नंतर पोलिसांनी मृतदेह शोधून काढला आणि या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला.