Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टोलचा 'झोल'? तुम्हाला काय वाटतं?

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टोलचा ‘झोल’? तुम्हाला काय वाटतं?

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मराठमोळ्या अभिनेत्रीलाही लूटले! शेअर केला व्हिडीओ

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway) कामानिमित्त किंवा कुटुंबासाठी मुंबई- पुणे असा दैनंदिन प्रवास करत असताना अनेक प्रकारच्या समस्यांना प्रवाशांना दररोज तोंड द्यावे लागते. वाहतूक कोंडी, अपघात, दरड कोसळणे आणि जास्तीचा टोल असे अनेक अनुभव येत असतात. पण वेळेअभावी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. असाच एक अनुभव मराठमोळी अभिनेत्री ऋजुता देशमुखला (Rujuta Deshmukh) मुंबईहून पुण्याला जात असताना आला. तिच्यासोबत नेमके काय घडले हे सांगण्यासाठी तिने सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेत्री ऋजुता देशमुख हिचे माहेर पुण्यात आहे. म्हणजेच ती मूळता पुण्याची आहे. लग्नानंतर आज जवळपास २५ वर्ष ऋजुता मुंबईला राहते. तिच्या आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना भेटण्यासाठी त्या अनेकवेळा पुण्याला जात असतात. मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना तिला आलेला टोलनाक्यावरील अनुभवाबद्दल सांगत असताना ऋजुता म्हणते, “३१ जुलैला मी, माझी मुलगी आणि नवरा शिरीष आम्ही तिघे पुण्याला निघालो होतो. आम्ही पुण्याला जात असताना वाटेत लोणावळ्याला अनेकवेळा थांबतो. तिथे चहा पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो आणि तुम्हाला माहित आहे की, टोलचे मेसेज किंवा मेल्स मोबाइलवर उशिराने येत असतात.

तसेच ऋजुता पुढे म्हणाली की, “सामान्यपणे मुंबई-पुणे हायवेवर प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्यावर २४० रुपये आणि तळेगाव टोलनाक्यावर ८० रुपये टोल घेतला जात आहे. आम्ही पुण्याला घरी पोहोचल्यावर माझ्या नवऱ्याला टोल संदर्भात मेसेज आला होता की, त्यामध्ये खालापूरला २४० आणि तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये वजा करण्यात आले होते. म्हणजे एकूण ४८० रुपये टोल गेला होता. याची मी रितसर तक्रार केली. परंतु अजून देखील मला त्याचे उत्तर मिळाले नाही.

दुसऱ्या दिवशी (१ ऑगस्ट) पुन्हा मुंबईला जायला निघाले, तेव्हा टोल नाक्यावर गाडी थांबवून मी तेथील मॅनेजरला भेटले. तेव्हा त्याने मला सांगितले की, मॅडम तुम्ही लोणावळ्याला उतरलात म्हणून असा टोल कापण्यात आला असल्याची माहिती यावेळी त्याने दिली.

आता मुंबई ते लोणावळा २४० आणि लोणावळा ते पुणे २४० असे दोन भाग झाले आहेत. जेव्हापासून फास्ट टॅग सुरु झाला तेव्हापासून हे सुरु झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या टोलच्या मॅनेजरने मला २ टप्पे केल्यामुळे असा टोल कापल्याचे थेट उत्तर दिले. खरेतर मुंबई ते लोणावळा ८३ किलोमीटर अंतर आहे तर, लोणावळा ते पुणे ६४ किलोमीटर अंतर आहे. फक्त लोणावळ्याला थांबले म्हणून डबल टोल? यावर मला अजून देखील कोणतेही उत्तर मिळाले नाही.

अंतर वेगवेगळे असताना असा टोल कापणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? अशा अनेक गोष्टी घडतात आणि आपण किंवा मी गप्प बसते… कारण परिणाम काय होईल याची खात्री नसते. यावेळी मनात आले, बोलून बघूया!! खरंच असा नियम आहे का? आणि असला तर तो योग्यरित्या आहे का?” असा सवाल अभिनेत्री ऋजुता देशमुखने या व्हिडीओमार्फत उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, ऋजुताने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मोठ्या प्रमाणात कमेंट करत त्यांनाही असाच अनुभव आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. ऋजुताने या व्हिडीओमध्ये एमएमआरडीए, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा व्हिडिओ टॅग केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -