
श्रावणानिमित्त दैनिक ‘प्रहार’तर्फे प्रत्येक सोमवारी समाजातील वलयांकित व्यक्तिमत्त्वाच्या मुलाखतीची मेजवानी ‘श्रावणसरी’च्या रुपाने वाचकांसाठी सादर केली जात आहे. चौथ्या पुष्पात हजारो महिलांना स्वबळावर उद्योजक होण्याचे सामर्थ्य देणाऱ्या उद्योजिका मीनल मोहाडीकर ‘प्रहार’ कार्यालयात भेटीला आल्या होत्या. दैनिक ‘प्रहार’चे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रशासन लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
सर्वकाही उद्योजक घडविण्यासाठी...
तेजस वाघमारे
माझे शिक्षण मुंबई-पुण्यामध्ये झाले आहे. लॅब टेक्निशनचे शिक्षण जे.जे. हॉस्पिटलमधून घेतले. त्यावेळी लॅब टेक्निशनच्या इतर शिक्षण संस्था राज्यात नव्हत्या. केवळ जे. जे. महाविद्यालयात ५० जागा होत्या. त्यानंतर टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम केले. मोहन मोहाडीकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर सर्व महिलांना जसे बदलावे लागते तसे मलाही बदलावे लागले. त्यांची लासलगाव येथे पेपर फॅक्टरी होती. त्यावेळी लासलगावमध्ये फक्त एक रिक्षा आणि दोन टांगे होते. माझ्या मुंबईच्या मैत्रिणी ज्या वेळी तिकडे आल्या त्यावेळी त्या म्हणाल्या की, तू या गावात आलीस? तेव्हा लासलगावमध्ये ४० डॉक्टर होते, तर माझी एकमेव पॅथॉलॉजी लॅब होती. त्यामुळे मी बिझी असायचे. ट्रेन येईल तेव्हाच तिथे रिक्षा आणि टांगे उपलब्ध असायचे. मात्र आता शहर विस्तारले आहे.माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्यात बदल झाला. लासलगाव म्हणजे कांद्याचे गाव. तिथे खळ्यामध्ये काम करण्यास महिला मिळायच्या. पण घरी काम करण्यास महिला मिळत नाहीत. त्यामुळे मला बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला, अन्यथा मी लासलगावमध्येच पॅथॉलॉजिस्ट म्हणून राहिले असते. मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आतापर्यंतचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेली मी एकमेव महिला ठरली.
रत्नागिरीचा माझा जन्म आहे. देसाई बंधू आंबेवाले हे माझे आजोळ. त्यांच्या प्रॉडक्ट्सपासून माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली. त्यावेळी मला खरेच माहीत नव्हते की, मी उद्योजक होणार आहे. पण संधीला पकडता आल्यास तुम्ही पुढे जाऊ शकता, हे मला समजले. मला उद्योजक व्हायचे आहे अशांचे फोन येतात, त्यांना मी स्वतःवर निबंध लिहिण्यास सांगते. म्हणजे, तुमच्या क्षमता, कमतरता काय आहेत?, या गोष्टी कळतील. उद्योगाचा विचार करताना महिलांनी आपली कौटुंबिक जबाबदारी पाळायलाच हवी. माझी मुलगी मधुरा आता "आम्ही उद्योगिनी"चे काम पाहत आहे. माझा व्यवसाय ती पाहत असली तरी तिने स्वतःचा टुरिझमचा व्यवसाय सुरू केला आहे.
उद्योग सुरू करण्यासाठी घरातून पाठिंबा लागतो. त्याबाबतीत मी लकी आहे. माझ्या सासू-सासऱ्यांनी माझ्या मुलीला बघितले नसते, तर मी काहीच करू शकले नसते. घरची स्वयंपाक करण्याचीही कधी जबाबदारी नव्हती." मला जे करता आले नाही ते तू कर" असे सासूबाई म्हणायच्या. अशी कुठलीच सासू त्या वेळेला म्हणजे ३५ वर्षांपूर्वी नव्हती. माझे वडील आणि आजोबाही उद्योजक होते.
आयइएस, महाराष्ट्र चेंबरचे प्रेसिडेंट पद्माकर ढमढेरे यांची मी मुलगी. माझ्या वडिलांच्या अंत्ययात्रेपेक्षा माझ्या आईच्या अंत्ययात्रेला अधिक गर्दी होती. कारण संपूर्ण दादर टी टी सर्कलमध्ये तिने कधी बटाटा वडा खाल्ला नाही, पण बटाटे वडा बनविणाऱ्या महिलेलाही आर्थिक मदत केली. आईने माणसे गोळा केली, मीही तेच केले. चांगले काम केले की पैसा येतो. चांगली माणसे जोडणे हे आपले काम आहे. तशी माणसे मी जमा करत गेले. मराठी माणूस उद्योग करत नाही असे आपण म्हणतो. पण जे उद्योग करत आहेत, त्यांना आपण पुढे जाऊ देत नाही, आपण त्यांचेच पाय खेचतो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. उद्योग करायचा असेल, तर पॉझिटिव्ह असायला हवे. कोरोना काळात खरेच निगेटिव्हिटी होती. पण त्यामधूनही अनेकांनी पॉझिटिव्ह विचार करत उद्योग उभा केले. "आम्ही उद्योगिनी" हे २५ वर्षांपूर्वी स्थापन झाले. हे त्रैमासिक आहे. प्रिंटनंतर आम्ही ऑनलाइन आलो. उद्योजक घडवण्यासाठी आम्ही पैसे न घेता काम करत आहोत. उद्योजकांनी कर्ज घेतले असल्यास व्याजावर व्याज चढू देता कामा नये, तर तो उद्योग वाचू शकतो. उद्योजकांनी आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतही आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. टाइम, मनी मॅनेजमेंट, एच आर ही उद्योगाची त्रिसूत्री आहे. कोणतेही काम आजच केले पाहिजे, उद्या कधीच येत नसतो, असे माझे ठाम मत आहे. उद्योग यशस्वी करायचा असेल तर उत्पादनाचे मार्केटिंग महत्त्वाचे असते. मी ब्रँडेड फूड प्रोडक्टच्या दुकानांबाहेर उत्पादनांची मार्केटिंग केली आहे. जिथे महिला आहेत तिथे मार्केटिंग करा, असा माझा सल्ला आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासह उद्योगाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मला वाटते.

“उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः!”
सायली वंजारी
"उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः!” म्हणजेच तुम्हाला जर एखादा उद्योग करायचा असेल, तर तुम्ही आळस सोडा, अधिक कार्य करा आणि कृती करा म्हणजे कोणतेही कार्य असाध्य नाही. आज आपण आजूबाजूला बऱ्याच महिला बघतो, ज्यांनी छोटे-छोटे उद्योग सुरू करून उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. मीनल मोहाडीकर यांचे कार्य हे तळागाळातील महिलांना प्रोत्साहित करणारे आहे, त्यामुळे त्यांचा परिचयच त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणारा ठरतो. आज त्यांनी उभारलेला हा उद्योगरूपी डेरेदार वृक्ष जो हजारो महिलांना आर्थिक पाठबळ देत आहे, त्यामागे त्यांनी अहोरात्र केलेली मेहनतरूपी मशागत आहे.
उद्योग कसा सुरू करावा?, तो यशस्वीरीत्या पुढे कसा रेटावा?, आपल्याला कोणत्या सरकारी योजना उपयुक्त ठरतील?, वेळेचे नियोजन, पैशाचे नियोजन, मार्केटिंग कसे करावे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी संघटना म्हणजे “आम्ही उद्योगिनी”. उद्योग कसा सुरू कराल आणि त्यात यशस्वी कसे व्हाल? या प्रश्नावर त्यांनी चोख असे उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, स्वतःच्या क्षमतांची आधी पारख करा. कोणतीही महिला घरची जबाबदारी झटकू शकत नाही, त्यामुळे त्या जबाबदाऱ्या पेलवून तुम्ही पुढे जा. मिळालेल्या संधीचं सोने करा. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर तुम्ही कशी मात कराल याचा अभ्यास करा. अशा अनेक पैलूंचा विचार करून तुम्ही व्यवसायात उतराल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असा कानमंत्र त्यांनी दिला.
मीनलताईंच्या मते, उद्योजक होण्यासाठी यश मिळेपर्यंत आणि यशानंतरही अविश्रांत काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. अनेक स्टार्टअप अयशस्वी का होतात यावर अभ्यास करण्याचा त्यांचा मानस आहे. आपण जे काम करतो त्याच्याबद्दल आदर हवाच. समोरच्याचा विश्वास कमावता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कामाला अध्यात्माची सांगड हवी असा सल्ला त्यांनी दिला.

उद्योगांचा वेलू गेला गगनावेरी!
रूपाली केळस्कर
उद्योजकतेचे बाळकडू देणारी एक यशस्वी मराठी उद्योजिका मीनल मोहाडीकर यांना ‘दैनिक प्रहार’च्या ‘श्रावणसरी’ कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी ४.०० वाजता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रम सुरू होण्याच्या साधारणपणे २५ मिनिटे अगोदरच त्या ‘दै. प्रहार’च्या कार्यालयात पोहोचल्या. उद्योजक म्हटले की, ते वेळेचे पक्के असतात. ‘प्रहार’च्या श्रावण सरीतली ही चौथी सर ज्ञानरूपी अमृत कुभांनी भरलेली, विलक्षण आत्मविश्वास देणारी आणि ज्ञानाचे दान आपल्या ओंजळीतून उधळणारी, आशेच्या किरणांची पखरण करणारी होती असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
मीनलताई म्हणजे ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या पहिल्या महिला अध्यक्षा अशी त्यांची ओळख. अतिशय साधा, सरळ आणि सोज्वळ स्वभाव, साधे राहणीमान. बोलण्यात स्पष्टवक्तेपणा ठासून भरलेला. एखाद्या तरुणीचा उत्साह त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीवर त्या भरभरून बोलल्या. महाराष्ट्रातून सुरू केलेली ही मोहीम त्यांनी सातासमुद्रापार नेली. आता या मोहिमेची सूत्रे त्यांनी त्यांची मुलगी मधुराच्या हातात दिली आहेत. महाराष्ट्रातील शेकडो महिलांना त्यांनी ‘उद्योग साक्षर’ केले. महाराष्ट्र, गोवासह, दुबई, कॅनडा इत्यादी देशांत त्यांनी भारतातील उत्पादने पोहोचवली. वेगवेगळ्या देशातील व्यापाराशी निगडित संस्थांबरोबर हितसंबंध जोपासून भारताचे नाव रोशन केले. आता ‘ग्लोबल’ महाराष्ट्राची संकल्पनाही रुजली आहे.
व्यापाराचा खडतर मार्ग त्यांनी निवडला. त्यांना कुटुंबीयांची साथ मिळाली. उद्योग जगतात ठेवलेले पाऊल घट्ट रोवणे तितके सोपे नाही. ती एक तपस्या आहे. त्यांनी संघटनात्मक कार्यावर भर दिला. ‘एकीचे बळ मिळते फळ’ ही म्हण सार्थ करून दाखवली. ‘आम्ही उद्योगिनी’चे एक रोपटे त्यांनी लावले, त्याचा आता ‘वटवृक्ष’ झालाय. तसेच व्यावहारिकतेला त्यांनी ‘अध्यात्माची’ जोड दिली. हे त्यांच्या सकारात्मकतेचे रहस्य आहे. स्वामी स्वरूपानंदांवर त्यांची अढळ श्रद्धा आहे. एक ‘पॅथॉलॉजिस्ट’ वेगळा मार्ग चोखाळते हे विलक्षण आहे. चिकाटी, मेहनत, नीटनेटकेपणा, माणसे जोडण्याची कला, विक्री कौशल्य, नावीन्याचा स्वीकार, कर्तबगारांचे कौतुक, तरुणांना उत्तेजन, शासकीय योजनांची माहिती, उत्तम गणित, संकटावर मात करण्याची क्षमता, देवावर आणि स्वत:वर प्रचंड विश्वास असे अनेक व्यक्तिमत्त्वांचे पैलू या भेटीत उलगडत गेले.
वालचंद हिराचंद यांना त्यांनी आपले आदर्श मानले. अनेक यशस्वी उद्योजकांच्या कार्यशैलीचा त्यांनी अभ्यास केला. उद्योगात झोकून देण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. नेतृत्व आणि दातृत्व देखील असावे लागते. माणसाचे मन मोठे अन् स्वच्छ असावे लागते. श्रावणात बरसणाऱ्या सरींसारखं... सगळं आसमंत भिजवून टाकणारं... नदी बनून वाहणारं...अन् अखेर समुद्रात जाऊन सामावणारं...विशालतेला कवटाळणारं!
Vinisha Dhamankar August 7, 2023 03:06 PM
उत्तम लेख. टीम प्रहारचे अभिनंदन. मीनल मोहाडीकर यांच्या कार्याला सलाम.