इंफाळ (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबलेला नसून गेल्या २४ तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागातील हिंसक घटनांमध्ये पिता-पुत्रासह एकूण सहा जणांची हत्या झाली आहे. बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात सकाळपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात १६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला पाचारण करण्यात आले असून लष्करी जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. बंदुकीची गोळी लागून जखमी झालेल्या एका बंडखोराला लष्कराने ताब्यात घेतले आहे.
सुरक्षा दलातील सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, या भागात झालेल्या हत्यांपैकी दोन जणांना खूप जवळून गोळ्या घातल्या आहेत. तसेच त्यांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी रविवारी इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये संचारबंदीमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचं सांगितं जात आहे.
बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमेवर शनिवारी (५ ऑगस्ट) अनेक ठिकाणी मोर्टार आणि ग्रेनेड हल्ले झाले.
तसेच दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. गेल्या दोन आठवड्यांपैकी कालच्या दिवशी इम्फाळसह बिष्णुपूर-चुराचांदपूरमधली परिस्थिती खून नाजूक होती.